मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

Published on -

अहमदनगर :- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या २१ वर्षांच्या तरुणास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी त्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

सुरज ऊर्फ अप्पा बबन माने (जयभवानी चौक, काष्टी, ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी आई-वडिलांसह काष्टी येथे रहात होती. सकाळी ८ च्या सुमारास ती कॉलेजला पायी जात असे.

जय भवानी चौकात सुरज दररोज तिचा पाठलाग करायचा, तिला उद्देशून बाेलायचा. २८ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी साडेसात वाजता मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाली होती. त्यावेळी आरोपीने लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

मुलीने आरडाओरड केल्यानंतर आरोपी पळून गेला. घडलेला प्रकार पीडितेने आई-वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन त्यास समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु सायंकाळी आरोपी पीडितेच्या आई-वडिलांकडे आला.

तुम्ही पुन्हा माझ्या घरी येऊ नका, अन्यथा तुम्हाला जीवे मारून टाकेन, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे आई-वडिलांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तपासी अधिकारी मंतोडे यांनी गुन्ह्याचा तपास करत सुरजच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश नावंदर यांच्यासमोर हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले.

पीडित मुलगी व तिच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्ष व सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे सुरजला दोषी ठरवण्यात आले. त्याला तीन वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe