श्रीरामपूर :- अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा होणार असून येत्या २२-२३ फेब्रुवारीला ही घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा कृती समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळेच श्रीरामपूर जिल्हा होणार असल्याचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले.
येथील एमआयडीसीत ५ कारखाने लवकरच सुरु होणार असून त्यामुळे २ ते ३ हजार युवकांना रोजगार मिळेल, असेही कांबळे म्हणाले. नगर परिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आझाद मैदानावर आयोजित रोजगार व कौशल्य प्रशिक्षण नोंदणी मेळाव्यात ते बोलत होते.
नगराध्यक्ष अनुराधा आदिक, एमआयडीसीचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, नगरसेवक राजेंद्र पवार, वैशाली चव्हाण, संयोजक रेखा चाटे, स्वाती निरगुडे, वर्षा पाठक, ग्रंथपाल स्वाती पुरे यावेळी उपस्थित होते. एमआयडीसीतील १३५० एकरांपैकी ४५० एकर जागा शिल्लक आहे.
नवीन कारखानदारांना आपण येथे येण्याची विनंती करत आहोत. येथे कुठलेही युनियन नाही. तुम्ही या, उद्योग सुरु करा, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, असे मी त्यांना सांगितले, अशी माहिती आमदार कांबळे यांनी दिली. श्रीरामपूर येथे पासपोर्ट कार्यालय २२ तारखेला सुरु होत आहे, असे ते म्हणाले.