सिंधुदुर्ग : फ्लाय९१ या विमानसेवेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील विमानसेवेची वारंवारता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी आठवड्यातून फक्त दोनदा उपलब्ध असलेली ही सेवा आता आठवड्यातून पाच दिवस चालणार आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील संपर्क अधिक दृढ होणार असून, पर्यटन, व्यवसाय आणि सामाजिक देवाणघेवाणीला मोठी चालना मिळणार आहे.
वाढलेली सेवा
फ्लाय ९१ ही विमानसेवा कमी सुविधा असलेल्या भागांना मोठ्या शहरांशी जोडण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवेची वारंवारता वाढवल्याने या भागातील प्रादेशिक विकासाला गती मिळेल. कोकणातील निसर्गरम्य किनारे, ऐतिहासिक किल्ले आणि सांस्कृतिक वारसा यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, पुणे हे शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्याने व्यवसायिक संधीही विस्तारतील. या सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन आर्थिक व्यवहारांना गती मिळेल, ज्याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला होईल.

आणखी एक पाऊल पुढे
अलीकडेच सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू झाली असून, यापूर्वी चिपी विमानतळ ते मुंबई ही नियमित सेवा काही महिन्यांपासून बंद होती. या सेवेच्या पुनरुज्जनासाठी आणि चिपी विमानतळावरील इतर सुविधा सुधारण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग विमानतळाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून, अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई ही सेवा पुन्हा सुरू केली आहे. आता फ्लाय९१ ने पाच दिवसांच्या सेवेसह आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
खासदार राणेंचा पाठपुरावा
खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी विमानसेवेचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. त्यांनी रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम (RCS) अंतर्गत सिंधुदुर्गसाठी आणखी पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची आणि अलायन्स एअरची सेवा नियमित करण्याची मागणी केली होती. चिपी विमानतळावरून पुणे आणि मुंबई या दोन्ही मार्गांवर सुविधा वाढवण्यासाठी त्यांनी उड्डाण संचालनालयाकडे विशेष धोरणाची विनंती केली होती. त्यांच्या या प्रयत्नांचा परिणाम म्हणूनच विमानतळावरील अनेक सेवा आणि सुविधा अद्ययावत करण्याचं काम वेगाने सुरू आहे. सिंधुदुर्ग-पुणे मार्गावर आठवड्यातून पाच वेळा विमानसेवा सुरू होणं हे त्याचं यशस्वी फलित मानलं जात आहे.
पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला उभारी
सिंधुदुर्ग हे कोकणातील एक उभरतं पर्यटन स्थळ आहे, जिथे समुद्रकिनारे, किल्ले आणि स्थानिक संस्कृती यामुळे पर्यटक आकर्षित होतात. पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराशी थेट संपर्क वाढल्याने पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल. त्याचप्रमाणे, स्थानिक प्रवाशांना व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक कारणांसाठी पुण्यात जाणं सोयीचं होईल. या सेवेमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.