जमावाच्या हल्ल्यात सख्ख्या भावांचा मृत्यू पोलिसांकडून सहा संशयित ताब्यात

Published on -

आष्टी : जमावाने लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने तीन सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला केला. यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. खळबळ उडवून घेणारी ही घटना तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणात ६ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

भरत विलास भोसले व आदिनाथ विलास भोसले असे मयतांची नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. हातोळण (ता. आष्टी) येथील आदिनाथ विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरुवारी आले होते.

याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरुवारी दुपारपासून हे सर्वजण याच ठिकाणी होते. रात्री १० वाजेच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात आदिनाथ विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेप्रकरणी ६ संशयितांना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरून केला, हे अद्याप समजले नाही. दोन्ही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. दोन सख्ख्या भावडांचा खून झाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मयताच्या कुटुंबातील महिलांचे हुंदके अन् आक्रोश पाहून उपस्थितही हेलावून गेले. घटनास्थळी अंभोरा

ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे, भरत माने, बाबुराव तांदळे, लुईस पवार, दत्तात्रय टकले, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे, अमोल शिरसाठ यांनी भेट दिली. जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बीड जिल्हा पुन्हा हादरला
वाहिरा (ता. आष्टी) येथे दोन सख्ख्या भावांचा जमावाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली. अगोदरच जिल्ह्यातील संवेदशील परिस्थिती त्यात आता अंबाजोगाई येथे व्यापाऱ्यावर झालेला प्राणघातक हल्ला, अंबाजोगाईच्याच मोरेवाडीतील गोळीबार आणि वाहिरा येथील दोन सख्ख्या भावांचा खून या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपास पथके रवाना करत यातील संशयित ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली जात आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी गोपनीय माहिती काढून ६ संशयित
आरोपींना गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ताब्यात घेतले. तसेच या गुन्ह्यात जे पाहिजे आरोपी आहेत, त्यांना पकडण्यासाठी आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. त्यांना पोलीस लवकरच जेरबंद करतील. अधिक तपास पोलीस करत आहेत.
मंगेश साळवे, सपोनि. अंभोरा पोलीस ठाणे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!