Vande bharat Express : मुंबई ते दिल्ली दरम्यान स्लीपर वंदे भारत धावणार !

Ahmednagarlive24 office
Published:
Vande bharat Express

Vande bharat Express : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचा बोलबाला सुरू असताना मुंबई-दिल्ली-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आनंदात लवकरच भर पडणार आहे.

या मार्गावर कायम विमानसेवा आणि रेल्वेची मागणी वाढत असताना भारतीय रेल्वेने या मार्गावर पहिली स्लीपर वंदे भारत चालवण्याची चाचपणी सुरू केली आहे. लवकरच मुंबईतून देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे.

चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीत वंदे भारतचे स्लीपर कोच तयार केले जात असून मुंबई ते दिल्ली दरम्यान ‘मिशन रफ्तार’ अंतर्गत सुरू असलेली बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे वर्षअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता असल्याने मुंबई-दिल्ली मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचा विचार सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान, असे झाल्यास मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवासातील ४ तासांची बचत होत अवघ्या १२ तासांत हा प्रवास पूर्ण करता येणार आहे. बुलेट ट्रेनसारखी दिसणारी, ताशी १२० ते १६० किमी वेगाने धावणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन अल्प काळातच प्रवाशांच्या पसंतीस पडली आहे. वेगवान प्रवास, वेळेची बचत,

अत्याधुनिक सुविधा ही सर्व उद्दिष्टे साध्य करत वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आली. एकूण २३ वंदे भारत ट्रेन सध्या देशात सुरू असून सर्व मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच मुंबई – दिल्ली सर्वाधिक प्रवास होणारा मार्ग आजही अधिकचा वेळ रेल्वे प्रवासासाठी घेत आहे.

मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गाने जाण्यासाठी १६ तास लागत आहेत. हा कालावधी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. रशियाच्या टीएमएच आणि आरव्हीएनएलसोबत यासाठी संवाद झाला असून त्यांनी १२० कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सद्यस्थितीत या मार्गावर ‘मिशन रफ्तार’ द्वारे रुळांचे मजबुतीकरण, ओव्हरहेड वायरचे आधुनिकीकरण, मार्गावर कवच यंत्रणा कार्यान्वित करणे, मार्गाच्या दोन्ही बाजूला कुंपण बसवणे, संपूर्ण मार्ग ताशी १६० किमी वेगासाठी सक्षम करण्याचे काम सुरू आहे. भविष्यात हे अंतर १६ तासांऐवजी १२ तासांत प्रवाशांना पार करता येईल,

‘मिशन रफ्तार’ अंतर्गत मुंबई-दिल्ली मार्गावरील सिग्नलिंग यंत्रणा अपग्रेड करणे, रुळांचे मजबुतीकरण ही कामे सुरू आहेत. या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेईल. अद्याप तशा कोणत्या सूचना आलेल्या नाहीत. – सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क – अधिकारी, पश्चिम रेल्वे

काही ठळक वैशिष्ट्ये :

२०० स्लीपर वंदे भारत ट्रेन निर्मिती, देखभाल करण्यासाठी रेल्वे विकास लिमिटेड (आरव्हीएनएल) सोबतच्या करारामध्ये ट्रान्समॅशहोल्डिंग (टीएमएच) ही सर्वात कमी बोली म्हणून समोर

रेल्वे प्रशासनाचा आयसीएफकडे ८६ वंदे भारत ट्रेन बनवण्याचा करार

यामध्ये ९ स्लीपर ट्रेनचा समावेश

भविष्यात येणाऱ्या वदे भारत ट्रेनमध्ये वंदे भारत सीटिंग व्हर्जन, स्लीपर व्हर्जन आणि मेट्रो व्हर्जनचा समावेश

राजधानी, शताब्दी, तेजस, दुरांतो एक्स्प्रेस देखील १६० किमी प्रतितास अशा वेगाने धावेल.

या मार्गावर रुळांवर नवे स्विच कर्व लावण्यात येत असून यामुळे वेग कमी न करता ट्रेन ट्रैक बदलणे शक्य

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe