Maharashtra News : मुंबई मराठा-कुणबी, कु णबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीस राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी आढळून आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.
मात्र, शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरू केल्यापासून राज्यात १ लाख ४७ हजार कुणबी प्रमाणपत्रे संबंधितांना वितरीत करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली आहे.
त्यामळे राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या असताना इतक्या कमी संख्येने कुणबी जातप्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्यामुळे आता मराठा नेत्यांनी राज्य सरकारला खिंडीत गाठण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात आढळलेल्या ५४ लाख नोंदीच्या मुद्यावरून मराठा आरक्षणाचे अभ्यासक संजय लाखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लध केले आहे. माजी न्या. संदीप शिंदे समितीला राज्यात नव्या केवळ १ लाख ४७ हजार नोंदी सापडल्या आहेत,
त्यापैकी मराठवाड्यात ३२ हजार नोंदी सापडल्या असताना सरकारने न्या. शिंदे समितीस राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याचा खोटा दावा का केला? असा सवाल लाखे-पाटील यांनी केला आहे.
सरकार दावा करत असलेल्या ५४ लाख नोंदी या १९६७ पासूनच्या आहेत. मात्र, मराठा आरक्षणासाठी सरकार किती युद्धपातळीवर काम करत आहे, हे दाखवण्याच्या नादात सरकारने या सर्व नोंदी निवृत्त न्या. शिंदे समितीला सापडल्याचा खोटा दावा केला.
नागपूर अधिवेशनात देखील राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती, आता मात्र शनिवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत सरकारच्या अधिकाऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पडल्याचे लाखे पाटील म्हणाले.
तसेच मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील सरकारने दावा केलेल्या याच ५४ लाख कुणबी नोंदीचा संदर्भ घेत मराठ्यांना इतक्या मोठ्या संख्येने कुणबी प्रमाणपत्रे दिली गेल्यास ओबीसींतील अनेक जाती आरक्षणापासून वंचित राहतील, असा प्रचार करत त्याविरोधात ओबीसींना एकत्र येण्याची हाक दिली होती. त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा सामाजिक तणाव निर्माण झाला होता.
आता मात्र सरकारने माजी न्या. शिंदे समितीस ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याचा केलेला दावा खोटा ठरल्याने भुजबळ यांनी ओबीसी समाजाला घातलेली भीतीदेखील अनाठायी ठरली आहे. त्यामुळे ५४ लाख नोंदी सापडल्याची खोटी माहिती देऊन मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करून त्यांच्यात तणाव निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल लाखे पाटील यांनी केला आहे.