सौरऊर्जा ग्राहकांची लूट ! ३ रुपयांना वीज द्या, १७ रुपयांना परत खरेदी करा

Published on -

सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या नव्या प्रस्तावामुळे मोठा फटका बसणार आहे. जर एखाद्या ग्राहकाने स्वतःच्या घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून वीज निर्माण केली, तर महावितरण त्याच्याकडून ती वीज फक्त ३ रुपये प्रति युनिट दराने खरेदी करेल. पण, जर त्याच ग्राहकाला महावितरणकडून वीज खरेदी करायची असेल, तर त्यासाठी १७ रुपये प्रति युनिट एवढा जादा दर मोजावा लागेल.

या निर्णयामुळे अनेक सौरऊर्जा ग्राहक संतप्त झाले असून, हा नियम सौरऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या नागरिकांसाठी तोट्याचा ठरत आहे. ग्राहकांनी वीज नियामक आयोगाकडे तक्रारींचा ओघ सुरू केला आहे, मात्र महावितरण यावर कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यास तयार नाही.

सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना बिलाचा जबरदस्त शॉक

सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी टेलिस्कोपिंग बिलिंग प्रणाली लागू केली जाणार आहे. जर एखाद्या ग्राहकाचा मासिक वीज वापर १०० युनिटच्या वर गेला, तर त्याचे बिल ५०० रुपयांवरून थेट १५०० रुपयांपर्यंत वाढू शकते. यामुळे सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांचे वीज बिल अधिक महाग होण्याची शक्यता आहे.

फक्त ८ तास वीज वापरण्याची मर्यादा

पूर्वी सौरऊर्जा ग्राहकांना २४ तास सौर प्रकल्पाद्वारे तयार केलेली वीज वापरण्याची मुभा होती. मात्र, नव्या प्रस्तावानुसार सौरऊर्जेचा उपयोग फक्त ८ तासांपर्यंतच करता येईल. याचा अर्थ असा की, जर एखाद्या ग्राहकाला १२ किलोवॉट विजेची गरज असेल, तर त्याला फक्त ४ किलोवॉटचा लाभ मिळेल.

उर्वरित ८ किलोवॉट वीज ग्राहकाला महावितरणला ३ रुपये प्रति युनिटने विकावी लागेल, मात्र जर त्याने तीच वीज पुन्हा महावितरणकडून खरेदी करायची ठरवली, तर त्यासाठी १७ रुपये प्रति युनिट मोजावे लागतील. यामुळे सौरऊर्जा ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे.

निवासी ग्राहकांसाठी अडचणी

निवासी ग्राहकांनी घरातून ट्युशन, ब्युटी पार्लर, वकिली किंवा पेइंग गेस्ट सुविधा चालू केल्यास, त्याला निवासी ग्राहक मानले जाणार नाही. परिणामी, अशा ग्राहकांच्या वीज दरात मोठी वाढ होणार आहे. यामुळे लहान व्यावसायिक आणि स्वतंत्ररित्या काम करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागू शकतो.

व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मर्यादा

सोलार वापरणाऱ्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी देखील ही नवीन प्रणाली मोठ्या अडचणी निर्माण करणार आहे. पूर्वी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात सौरऊर्जा २४ पैकी २० तास वापरण्याची मुभा होती. मात्र, आता फक्त ८ तास सौरऊर्जा वापरण्याची परवानगी असेल, आणि उर्वरित १६ तास महागडी वीज महावितरणकडून घ्यावी लागेल.

यामुळे व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसणार असून, सौरऊर्जा प्रकल्पांवरील गुंतवणूक तोट्याची ठरू शकते. यामुळे महाराष्ट्रातील सौरऊर्जा उद्योगाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

केव्हीएच बिलिंग प्रणालीमुळे जादा खर्च

एचटी वर्गवारीतील (उच्च दाब वीज ग्राहक) ग्राहकांना सुरुवातीपासून केव्हीएच बिलिंग प्रणाली लागू होती. मात्र, आता एलटी (कमी दाब) ग्राहकांनाही हीच प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना जास्त बिल भरावे लागेल. नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना एपीएफसी (ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर करेक्शन) डिव्हाईस बसवण्याची गरज भासेल, अन्यथा त्यांचे वीज बिल दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकते.

महावितरणच्या धोरणावर ग्राहकांचा रोष

महावितरणच्या नव्या प्रस्तावामुळे सौरऊर्जा ग्राहकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. हा निर्णय सौरऊर्जा वापरणाऱ्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याचे मत अनेक पर्यावरण आणि ऊर्जा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

महावितरणकडून दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला असून, तो अजून मंजूर झालेला नाही. मात्र, जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर महाराष्ट्रातील सौरऊर्जा क्षेत्राचे भवितव्य धोक्यात येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe