एसटी भाडेवाढ प्रवाशांसाठी धक्कादायक ; तिकीट दरात १५ टक्के वाढ,नियमित सवलती कायम

१३ फेब्रुवारी २०२५ सुपा : सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन असणाऱ्या एसटीचा प्रवास आता महागला आहे.एसटीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची दरवाढ, डिझेल व टायरच्या किमतीत झालेली वाढ,यामुळे एसटी महामंडळाने दि.२५ जानेवारी पासून १४.९५ टक्के एवढी प्रवासी भाडेवाढ केली आहे.यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार असली तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसली आहे.

प्रवाशांसाठी असलेल्या नियमित सवलती मात्र कायम ठेवण्यात आल्या आहेत.या भाडेवाढीमुळे ग्रामीण भागातील जनतेच्या खिशाला कात्री लागली असल्याने त्यांच्यासाठी ही भाडेवाढ धक्कादायक आहे.सोबत रिक्षा व टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून, या दोन्ही वाहनांच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे.

रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ १ फेब्रुवारी पासून अंमलात आली आहे. महत्वाचे म्हणजे एसटी बस तिकीट दरवाढीचा भार सामान्य प्रवाशांवर पडणार आहे. कारण महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत आहे तसेच ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी प्रवास मोफत आहे.नव्या तिकीट दरानुसार साधी बस, जलद सेवा, रात्रसेवा, निम आराम, शिवशाही, या बसेसच्या पहिल्या टप्प्यापासून तिकिट दरात वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे एसटी प्रवास महागला आहे.

प्रवाशांच्या दृष्टीने ही भाडेवाढ धक्कादायक आहे.राज्य सरकारच्या अखत्यारीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे देशातील सर्वात मोठया सार्वजनिक वाहतूक सेवेपैकी एक आहे.या दरवाढीमुळे आवडीच्या प्रवास पाससाठी देखील सर्वसामान्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.राज्यातील तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे व अन्य प्रेक्षणीय स्थळांसाठी विना व्यत्यय प्रवास करता यावा,यासाठी एसटी महामंडळाने आवडेल तेथे प्रवास योजना सुरू केली आहे.