CM Eknath Shinde : महायुतीत राज्यातून लोकसभेच्या ‘मिशन ४५’ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतानाच शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नका, असे आवाहनही आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून पदाधिकारी, नेते आणि प्रवक्त्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिकारी, प्रवक्ते, कार्यकर्ते आणि नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक घेतली.
विरोधकांनी पातळी सोडून टीका केली, तरी तुम्ही पातळी सोडू नका. भाषेचा सौम्य वापर करा. सकारात्मक उत्तर द्या जी काही कामे केलीत, त्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.
मराठा आरक्षण देताना ओबीसी समाजावर कुठेही अन्याय केला नाही. त्यांचेही आरक्षण अबाधित ठेवले आहे, हे देखील लोकांना पटवून सांगा. विरोधकांना कामातून उत्तर द्या. पक्षांतर्गत काही मतभेद, हेवेदावे आणि गैरसमज असतील ते स्थानिक पातळीवर मिटवा. पक्षामध्ये कोणतेही वाद निर्माण करू नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केल्या.
मोदींची औरंगजेबाशी तुलना हा देशाचा अपमान एकनाथ शिंदे
शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्यावरून शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या नेत्यांवर पत्रकार परिषदेत सडकून टीका केली. मोदींची अशी तुलना करणे खूप दुर्दैवी असून याचा निषेध करतो.
हा देशाचा अपमान आहे, असा संताप व्यक्त करून शिंदे यांनी ‘या औरंगजेब वृत्तीने स्वतःच्या भावालाही सोडले नाही. हा देशद्रोह आहे. जनता मतपेटीतून त्यांना याचे उत्तर देईल,’ अशी टीका ठाकरेंवर केली.