अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- राज्यातील वीज निर्मिती कंपन्यांना आधीच कोशळशाचा तुटवडा आहे. त्यातच आजपासून वीज कर्मचारी आणि कोळशासंबंधी कामे करणारे कर्मचारी संपावर गेले आहेत.
त्यामुळे सध्याचा साठा संपल्यास राज्यावर मोठे वीज संकट येण्याचा धोका आहे. याला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दुजोरा दिला, मात्र सरकार व कामगार यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याने अशी वेळ येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आजपासून अनेक कर्मचारी संघटना संपावर गेल्या आहेत. त्यामध्ये कोळसा आणि वीज कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यासंबंधी ऊर्जा मंत्री राऊत म्हणाले, राज्यात आधीच कोळशाचा तुटवडा आहे.
अशात वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे औष्णिक वीज प्रकल्पांमधील वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी लोडशेंडीगची वेळ येऊ शकते.
कोळश्याच्या तुटवड्याअभावी नाशकात वीज निर्मितीचे दोन प्लांट बंद करावे लागले. त्यामुळे नाशिकमध्ये लोडशेडींगची वेळ आली होती. सध्या उष्णतेची लाट, मुलांची परीक्षा आणि पिकांना पाणी देण्यासाठी विजेची गरज आहे.
संपावर गेलेल्या कामगार संघटनांशी चर्चा करण्याची आमची नेहमीच तयारी आहे. उद्या देखील त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावले आहे. त्यामध्ये सामंजस्याने तोडगा काढला जाईल.
सध्या थकित वीज बिलांमुळे महावितरण प्रचंड आर्थिक संकटात आहे. महावितरणवर कर्जही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे वीज निर्मितीत अडथळे येत आहे.
अशातच कृषिपंपधारकांना वीज बिल भरण्यासाठी सरकारने तीन महिन्यांची सवलत दिली आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील वीज बिल भरून सरकारला मदत करावी, असे आवाहन राऊत यांनी केलं आहे.