शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने १ एप्रिलपासून राज्यभरात अपात्र शिधापत्रिकाधारकांच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. ३१ मेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न जास्त आहे, जे लाभार्थी दिलेल्या पत्त्यावर राहत नाहीत किंवा ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व प्रकरणांची चौकशी होणार आहे.
फॉर्म भरून सादर करणे अनिवार्य
या तपासणी मोहिमेमध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला लेखी स्वरूपात फॉर्म भरून सादर करावा लागणार आहे. हा फॉर्म स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. लाभार्थ्यांनी फॉर्ममध्ये आवश्यक ती खरी माहिती भरून, आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक आहे.

अर्जांची ‘अ’ आणि ‘ब’ गटात छाननी
पुरवठा विभाग प्राप्त अर्जांची ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटांमध्ये वर्गवारी करणार आहे. ज्या अर्जांमध्ये योग्य कागदपत्रे आणि माहिती असेल ते ‘अ’ गटात तर अपूर्ण माहिती अथवा संशयास्पद अर्ज ‘ब’ गटात टाकण्यात येतील. ‘ब’ गटात समाविष्ट लाभार्थ्यांना पुढील १५ दिवसांच्या आत पुरावे सादर करावे लागतील. त्यानंतरही जर पुरावे दिले गेले नाहीत, तर शिधापत्रिका रद्द केली जाईल.
जास्त उत्पन्न असल्यास लाभ बंद
अर्ज भरताना उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आढळल्यास संबंधित लाभार्थ्यांची शिधापत्रिका अन्नसुरक्षा/अंत्योदय योजनेतून वगळून शुभ्र किंवा केशरी श्रेणीत स्थलांतरित केली जाणार आहे. यामुळे प्रत्यक्ष गरजूंपर्यंतच सरकारी धान्य पोहोचवण्याचा शासनाचा उद्देश साध्य होणार आहे.
कारवाई होणार
या मोहिमेत केवळ बोगस किंवा अपात्रच नव्हे, तर परदेशस्थ लाभार्थी आणि एकाहून अधिक शिधापत्रिका वापरणाऱ्यांवरही लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. जर पात्रता नसताना लाभ घेत असल्याचे आढळून आले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
पुरवठा विभागाचे आवाहन
या मोहिमेअंतर्गत केलेल्या तपासणीची आणि कारवाईची अंतिम माहिती १५ जूनपर्यंत शासनाकडे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत योग्य माहिती आणि पुरावे सादर करून आपल्या शिधापत्रिकेची वैधता कायम राखावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.