१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : एसटीची दरवाढ झाल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वादाच्या घटना घडल्याचे समोर आले. याची तत्काळ दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांच्यामध्ये वाद होऊ नये,यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून,मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.
याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयांपर्यंत सुट्ये पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्या पैशांवरून होणारे वाद टाळले जाऊ शकतात.दरम्यान, भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्या पैशांवरून वाद उद्भवणार नाहीत, याची काळजी महामंडळाने घ्यावी, अशी सूचना देखील प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
एसटी महामंडळाने रुपये ५ च्या पटीत भाडेवाढ करावी,असा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. पण त्यात बदल करून रुपया १ च्या पटीत भाडेवाढ करण्यात आलेली आहे. मात्र, यामुळे दरवाढ झाल्यापासून वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून वादावादी सुरू असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
प्रवासी संघटनांनी दरवाढीत दुरुस्ती करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या.याच पार्श्वभूमीवर वादावादी टाळण्यासाठी परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्वतः दखल घेत यूपीआय पेमेंट करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.
एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहे. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढले जात असून, त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्याने सुट्या पैशांमुळे होणारे वाद टाळता येत आहेत.
परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.
ऑनलाइन तिकीट उत्पन्न
(दर वाढण्यापूर्वी)
८७,५८,०६० (२१ जाने.)
८६,५०,९०५ (२२ जाने.)
८४,२३,०२५ (२३ जाने.)
६७,३६,०१८ (२४ जाने.)
(दर वाढीनंतर)
१,५३,०५,८६४ (२६ जाने.)
१,४६,०४,२७२ (२७ जाने.)
१,२५,१८,०८३ (२८ जाने.)
१,१९,८२,८४१ (२९ जाने.)