सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या लोकांच्या जीभा हासडल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचून काढले पाहिजे. तसेच अशांना गोळ्या घातल्या पाहिजे, असा तीव्र संताप छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वशंज खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्ग्राहून सुटकेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभर संताप सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्ग्रातून सुटण्यासाठी ‘पेटारे-बिटारे असे काहीच नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्ग्राहून सुटून महाराष्ट्रात परतले,’ असा दावा सोलापूरकर यांनी केला आहे.
त्याबाबत उदयनराजेंनी बुधवारी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. उदयनराजे म्हणाले, सर्वधर्म समभाव भावनेतून ज्यांनी सर्व समाजाला एक केले. एकता हा त्यामागचा एक मंत्र होता, राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा. ज्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो, त्या लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. वेगवेगळ्या जाती-धर्मातील लोकांना आपले कुटुंब मानले. त्यांनी कधी तत्त्वाशी तडजोड केली नाही.
त्यांनी स्वतःचे कुटुंब कधी पाहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच तडजोड केली नाही, त्यांच्याबद्दल गलिच्छ विधान केली जातात. दोन, तीन दिवसांपूर्वी असेच एक विधान केले. टीव्हीवर ते पाहत असताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्या. हा राहुल सोलापूरकर कोण. आहे? अशी लोक काही लाच घेतात, त्यांना लाचेपलीकडे काही समजत नाही. हे लोक बोलत असताना काहीही बोलतात.
अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जाती-धमौत जी तेढ निर्माण होतो ती अशा विकृत लोकांमुळे होत आहे, असेही उदयनराजे म्हणाले. शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही, तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधाने करणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीजमधील लोकांनी थारा दिला नाही पाहिजे, असे मला वाटते. त्याला गोळ्या घालून मारले पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.