Maharashtra News : अनेक वर्षांपासून धुळेकरांच्या प्रतिक्षेत असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी झोडगे (ता. मालेगाव) ते लळींग (ता. धुळे) घाटादरम्यान रेल्वे विभागाने सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले आहे. यासाठी सुमारे दोन किलोमिटर अंतरापर्यंत सुरूंग लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
झोडगे ते लळींग दरम्यान दोन बोगदे तयार करण्यात येणार असून यासाठी हे सर्वेक्षण होत आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यातील बोरविहीर ते नरडाणा दरम्यान भुसंपादनाची प्रक्रीया वेगाने सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला उर्वरित रेल्वेमार्गासाठी सर्व्हेक्षणाला गती आलेली आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची अनेक वर्षांपासून प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या या रेल्वेमार्गामुळे दळणवळणाच्या सुविधेत भर पडणार आहे.
यात बोरविहीर ते नरडाणापर्यंत पहिल्या टप्प्याचे काम रेल्वे विभागाने हाती घेतले असून भुसंपादनाची प्रक्रीया वेगाने सुरू आहे. रेल्वे मार्गाच्या उर्वरित टप्प्यासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे.
मनमाड ते बोरविहीरपर्यंत आता रेल्वे विभागाने सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले आहे. यासाठी झोडगे ते लळींग घाटादरम्यान दोन किलोमीटर अंतरापर्यंत सुरूंग लावून सर्व्हेक्षण केले जात आहे. पुणे येथील मोनार्क कंपनीतर्फे हे सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे.
कंपनीचे सर्व्हेयर राकेश पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील लळींग घाटात रेल्वे मार्गासाठी सर्व्हेचे काम सुरू केल्याचे सांगितले. रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी हा दोन्ही राज्यात दळणवळण वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.