Sushma Andhare : सध्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या राज्यभर दौरे करत आहेत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्या शिंदे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यामुळे त्या सध्या सतत चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. अंधारे या कोल्हाटी समाजाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने बारामतीत आल्या होत्या.
असे असताना पाच वाजता त्यांना मुंबईतून कोणाचा तरी फोन आला. फोन घेतला आणि अंधारे यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी तातडीने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. कारण तब्बल १८ वर्षे जो भाऊ घरातून निघून गेला होता, त्याने त्यांना फोन केला होता. पण त्याचा फोनच नंतर बंद झाला आणि पुन्हा मनात शंकेची पाल चुकचुकल्याने त्या त्याला शोधण्यासाठी त्या मुंबईला निघाल्या.
या फोनमुळे सुषमा अंधारे यांना १८ वर्षानंतर आयुष्यात मोठा धक्का बसला. त्या म्हणाल्या, तब्बल 18 वर्षांपूर्वी आमचा भाऊ घरातून कुणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेला सुरुवातीला दोन-तीन दिवस तू कुठेतरी गेला असेल परत येईल असे वाटले. मात्र तो परत भेटलाच नाही.
अनेक ठिकाणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ते सापडले नाहीत. पुण्यात आणि पुण्याबाहेर अनेक ठिकाणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न झाला. राज्याच्या बाहेर देखील शोध घेतला गेला. परवा गोरेगावमध्ये शिव संवाद यात्रेची सभा झाली आणि बांद्रापासून गोरेगाव पर्यंत दूतर्फा सभेच्या निमित्ताने बॅनर्स झळकले.
त्याच्या नजरेला हे बॅनर्स पडले आणि ही बॅनर वर असणारी व्यक्ती माझी बहीण आहे हे त्याने एका व्यक्तीला सांगितले. फेसबुक आणि इतरत्र माझा संपर्क क्रमांक शोधायला सुरुवात झाली. यामध्ये मित्र यादीमध्ये माझा दुसरा भाऊ धनराज याच्या फेसबुक पोस्टवर संपर्क क्रमांक त्याला मिळाला. त्याने स्वतःहून काल फोन केला.
त्याने मी मुंबईत आहे असे सांगितले. आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये मुंबईकडे निघालो. पण नंतर मात्र फोन अचानक बंद झाला. यामुळे मनात अनेक विचार येत होते. यानंतर मदतीसाठी आमदार सचिन भाऊ आहिर यांना फोन केला. ज्या नंबर वरून त्याचा फोन आला होता लोकेशन ट्रॅक केले.
त्याठिकाणी युवा सेनेच्या सगळ्या टीमला सांगितले. रात्री दीड वाजता आम्हाला अठरा वर्षांपूर्वी आमच्यापासून दुरावलेला भाऊ मिळाला, साडेनऊ वाजता सुरू झालेले शोध मोहीम रात्री दीड वाजता थांबली. याबाबत स्वता सुषमा अंधारे यांनी माहिती दिली आहे.