७ मार्च २०२५ राहुरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सहाय्यक आयुक्त तथा वॉर्ड ऑफिसर वरिष्ठ श्रेणी, गट अ, बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप दादासाहेब कुशाबापू पवार यांनी केला आहे.याबद्दल त्यांनी आयोगाकडे तक्रार केली आहे पण त्यावर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पवारांच्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्रमांक ०४/२०२१ अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत काही अपात्र उमेदवारांना नियमात बसत नसतानाही पात्र ठरवण्यात आले आहे.विशेषतः चार उमेदवारांची नावे पुढे करीत त्यांच्या अनुभव प्रमाणपत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात आयोगाने सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचे पवारांचे म्हणणे आहे.

यापूर्वीही विविध भरती प्रक्रियांमध्ये अपात्र उमेदवारांना निकालातून वगळल्याचे दाखले त्यांनी दिले. मात्र, या भरतीत तेच निकष लागू करण्यात आले नाहीत. त्यांनी भारतीय राज्यघटनेतील समान न्यायाचे तत्त्वाचा हवाला देत, अपात्र उमेदवारांवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
पवार यांनी आयोगाचे अध्यक्ष, सदस्य, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून सात दिवसांत योग्य कारवाई करावी, नाहीतर अन्यायाविरोधात आमरण करेल असे त्यांनी सांगितले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, उमेदवारांमध्ये या प्रकरणाची दखल घेतली जाईल का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.