स्वारगेट बलात्कार प्रकरण: १३ पथक, श्वान पथक, ड्रोन – तरीही चकवा देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

Published on -

पुणे स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तब्बल १३ पोलीस पथक, श्वान पथक आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. आरोपी चतुराईने पोलिसांना गुंगारा देत चार दिवस फरार होता. अखेर, ग्रामस्थांच्या मदतीने शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पोलिसांनी त्याला अटक केली.

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून दत्तात्रय गाडे फरार झाला होता. गुन्हा घडल्यानंतर तो पुण्यातून सरळ शिरूर तालुक्यातील आपल्या गावी, गुणाट येथे पोहोचला. पुणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू करताच तो ऊसाच्या शेतात लपला. दिवसा घरात आणि रात्री शेतात राहत होता. पोलिसांनी विविध मार्गांचा शोध घेतला, परंतु आरोपीने मोबाईल बंद ठेवल्याने त्याचे लोकेशन मिळवण्यात अडचणी आल्या.

पोलिसांनी बुधवारी रात्री त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. मात्र, त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता. याच दरम्यान, तो आपल्या गावातील कीर्तनालाही हजर होता, ज्याने पोलिसांना आणखी गोंधळात टाकले. गावकऱ्यांच्या संशयामुळे पोलीस तिथे पोहोचले, पण पोलिसांचा अंदाज लागताच आरोपीने छतावरून उडी मारून पळ काढला.

पोलिसांनी संपूर्ण गाव नाकाबंद करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ऊसाच्या शेतात ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. गावातील सर्व मुख्य रस्ते, निघण्याचे मार्ग, तसेच जंगल भागांमध्येही पोलिसांनी तपास सुरू ठेवला. मात्र, आरोपी अत्यंत चतुराईने हालचाली करत असल्याने तो शोधण्यात अडचणी येत होत्या.

गुरुवारी रात्री १०.३० वाजता तो आपल्या नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी गेला. तिथे त्याने पाण्याची बाटली घेतली आणि आपली मोठी चूक झाल्याचे सांगत सरेंडर करण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यानंतर तो पुन्हा एका कॅनॉलमध्ये जाऊन झोपला.

रात्री दीडच्या सुमारास प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि काही ग्रामस्थांनी त्याला पाहिले. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली. मात्र, ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. अखेर चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

गावातील नागरिकांनी आरोपीची सतत हालचाल लक्षात घेतली होती. पोलिसांना वेळोवेळी माहिती देऊन मदत केली. गावकऱ्यांना आपल्या गावावर लागलेला डाग पुसायचा होता, त्यामुळे त्यांनी आरोपीला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी समज दिली. पोलिसांनी गावातील प्रत्येक मार्गावर २४ तास नाकाबंदी सुरू ठेवली होती.

गावात आरोपी शोधण्यासाठी १३ पथके कार्यरत होती. श्वान पथकाचा वापर करून पोलिसांनी आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला. एका ठिकाणी त्याचा बदलेला शर्ट सापडल्याने पोलिसांनी तिथून शोधमोहीम अधिक तीव्र केली. रात्रीच्या वेळी ड्रोनच्या साहाय्याने ऊसाच्या शेतात त्याचा शोध घेण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe