स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर अटकेत

Published on -

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुणे लष्कर पोलीस ठाण्यात त्याला हलविण्यात आले असून, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आज दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे.

गावात लपून राहिल्यानंतर पोलिसांसमोर शरणागती

स्वारगेट येथे गुन्हा करून दत्ता गाडे शिरूरच्या गुणाट गावात लपला होता. दिवसा तो घरात राहायचा आणि रात्री ऊसाच्या शेतात लपायचा. पुणे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली. १३ पथकांनी रात्रभर शोध घेतला, तसेच ड्रोनच्या मदतीनेही त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गुरुवारी रात्री ११.४५ वाजता तो एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता. त्या महिलेने तत्काळ पोलिसांना कळवले. गावकऱ्यांनी आरोपीला शरण येण्याची विनंती केली. अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास दत्ता गाडेने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याला लगेच ताब्यात घेऊन लष्कर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

अटकेचा थरार

दत्ता गाडेने गुन्हा घडल्यानंतर मोबाईल बंद केला होता. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचे शेवटचे लोकेशन शोधून पथके रवाना केली. श्वानपथक आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

गुरुवारी दिवसभर त्याचा शोध सुरू असतानाही तो सापडला नव्हता. मात्र, गावकऱ्यांच्या सहकार्याने अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गावकऱ्यांनी गावाची बदनामी होऊ नये म्हणून आरोपीशी चर्चा केली आणि त्याला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त केले. आज दुपारी दत्ता गाडे याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe