पत्नीने पतीला त्याच्या माता-पित्यापासून वेगळे राहण्याचा हट्ट धरण्याचे कृत्य म्हणजे छळवणूक !

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : योग्य कारणाशिवाय पत्नीने पतीला त्याच्या माता-पित्यापासून वेगळे राहण्याचा हट्ट धरण्याचे कृत्य म्हणजे छळवणूक आणि क्रूरता ठरत असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले. एका खटल्यात विभक्त राहणाऱ्या पत्नीपासून पतीला घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाने ही परखड भूमिका व्यक्त केली.

विभक्त राहणाऱ्या पती-पत्नीच्या घटस्फोटाची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुमार कैत यांच्या नेतृत्वातील पीठासमोर सुनावणी झाली. या घटस्फोटाला मंजुरी देताना न्यायालयाने या प्रकरणात पत्नीच्या भूमिकेवरही बोट ठेवले.

कोणतेही उचित कारण नसताना पत्नीकडून पतीकडे सातत्याने त्याच्या आईवडिलांना सोडून वेगळे राहण्याचा आग्रह केला जात होता. मात्र हा पतीसाठी छळवणुकीचाच प्रकार असून ही क्रूरतेचीच बाब ठरत असल्याचे मत यावेळी न्यायालयाने व्यक्त केले.

पाश्चात्य संस्कृतीच्या तुलनेत भारतात आपल्या कुटुंबापासून त्यांच्या विवाहित मुलाने विभक्त होणे ही बाब सामान्य नाही. शिवाय विवाहानंतर घरी आलेली सूनबाई हीसुद्धा याच कुटुंबाचा अविभाज्य घटक बनत असते, असे निरीक्षण न्यायालयाने मांडले. या प्रकरणात आपल्या मागणीला योग्य ठरविणारे कोणतेही कारण दाखविण्यात पत्नी अपयशी ठरली होती.

न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अशाच प्रकारच्या एका निकालाचाही दाखला दिला. माता-पित्यांचा त्यांच्या वृद्धापकाळात सांभाळ करणे हे मुलाचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य असते. अशावेळी समाजातील प्रचलित प्रथा मोडत आईवडिलांपासून वेगळे होण्यासाठी पतीसमोर हट्ट धरण्यामागे योग्य कारण असणे आवश्यकच आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe