३१ जानेवारी २०२५ मुंबई : प्रवेशावर कडक निर्बंध घालून मंत्रालयातील बाह्य सुरक्षेचा गंभीरपणे विचार केला जात असला,तरी या इमारतीची अग्निसुरक्षा मात्र धोक्यात आहे.सुमारे एक तपापूर्वी भीषण आग लागूनही प्रशासन याबाबत उदासीन आहे, ही आश्चर्याची बाब आहे.मंत्रालय हे राज्याचे सत्ता आणि प्रशासकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, विविध मंत्र्यांची तसेच महत्त्वपूर्ण प्रशासकीय विभागांची कार्यालये असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक आपल्या कामाच्या निमित्ताने येत असतात.
याठिकाणी हजारो अधिकारी, कर्मचारी प्रशासकीय कामासाठी कार्यरत असतात. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागत यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.२१ जून २०१२ रोजी मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीत पाच नागरिकांचा मृत्यू झाला. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि अनेक विभागांतील महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. त्या घटनेचा कटू अनुभव प्रशासनाच्या पाठीशी असूनही प्रशासन आजही अग्नि सुरक्षिततेबाबत गंभीर नसल्याचे दिसते.

आगीसारखी दुर्घटना घडली तर कमीत कमी नुकसान व्हावे आणि प्रसंग आटोक्यात यावा यासाठी ‘फायर मॉकड्रिल’च्या माध्यमातून अग्नि सुरक्षिततेबाबतची तयारी जाणून घेणे आवश्यक असताना गेल्या दहा वर्षांपासून मंत्रालयात ‘फावर मॉकड्रिल’ झाले नसल्याची धक्कादायक माहिती मिळते. मंत्रालयातील वातानुकूलित यंत्रे आणि इतर उपकरणांमुळे आगीशी संबंधित संभाव्य धोके लक्षात घेता, आग रोखण्यासाठी, शोधण्यासाठी आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी कठोर प्रोटोकॉल आणि उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
सध्या मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील मोकळ्या जागा मंत्री कार्यालयांसाठी काबीज करण्याचा सपाटा लागला असल्याने सहजपणे बाहेर पडण्याचा मार्ग लक्षात येत नाही. परिणामी आगीसारखी दुर्घटना घडल्यास बाहेरील नवख्या नागरिकांना बाहेर पडण्यासाठी अडचण होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाच्या आवारात वाहनांच्या पार्किंगचा प्रश्नही बिकट झाला आहे.आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या गाड्या मंत्रालयात येऊ शकतील का ? याबाबत कोणीही खात्री देऊ शकत नाही.मंत्रालयाच्या अग्नि सुरक्षेसाठी तीन पाळ्यांमध्ये केवळ दहाच कर्मचारी कार्यरत असल्याने अग्निसुरक्षेबाबत प्रशासन किती दक्ष आहे, हे स्पष्ट होते.
‘फायर मॉकड्रिल’ म्हणजे काय ?
फायर मॉकड्रिल म्हणजे आग लागल्यास किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत इमारतीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा सराव करणे. या मॉकड्रिलमुळे आगीच्या व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक तयारी केली जाते. मॉकड्रिलमुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा आणि इतर आरोग्य आणि सुरक्षा प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचा सराव करण्याची संधी मिळते.
उदय सामंत यांच्या कार्यालयात आग
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात बुधवारी आगीची दुर्घटना घडली. सामंत यांच्या कार्यालयाच्या स्वच्छतागृहातील एक्झॉस्ट फॅन शॉर्टसर्किटने जळाला. ही घटना खिडकीतून आलेल्या धुरामुळे बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आली. मात्र त्यापूर्वीच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.
कर्मचाऱ्यांना गणवेश नाही
अग्निसुरक्षा विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागणी करूनही अद्याप गणवेश देण्यात आलेला नाही. परिणामी हे कर्मचारी अग्निसुरक्षा विभागातील असल्याचे लक्षात येत नाही. मध्यंतरी नरहरी झिरवाळ यांच्यासह काही आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्यानंतर अग्निसुरक्षा विभागातील कर्मचारी त्यांना बाहेर काढण्यासाठी पोहोचले, मात्र अंगावर गणवेश नसल्याने पोलिसांनी त्यांना न ओळखता पिटाळून लावले.
अवघ्या दहा कर्मचाऱ्यांवर अग्निसुरक्षा
सध्या मंत्रालयाची अग्निसुरक्षा पाहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अग्निसुरक्षा अधिकाऱ्यांसह तिन्ही शिफ्टमध्ये मिळून केवळ दहा जणांचा स्टाफ कार्यरत आहे. सध्याचे कार्यरत असणारे अग्निसुरक्षा अधिकारी हे प्रतिनियुक्तीवर असून गेल्या सहा महिन्यांपासून कायमस्वरूपी अग्निसुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही.
सध्या मंत्रालयातील आगीच्या घटना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाची १ गाडी तयारीत असते. पूर्वी १ रुग्णवाहिका, २ अग्निशमन गाड्या आणि १ पाण्याचा टँकर कार्यरत असे. हल्ली केवळ १ छोटी अग्निशमन गाडी नावाला तैनात असते. मंत्रालयासमोरील प्रशासकीय भवनाच्या अग्निसुरक्षेची जबाबदारीही याच दहा जणांच्या खांद्यावर आणि त्या छोट्या अग्निशमन गाडीवर आहे.













