महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने महिलांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९ हप्ते वितरित झाले असून, आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे लाभ महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.
आता एप्रिलचा हप्ता ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा लाभार्थींची संख्या वाढणार की घटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू असून, त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंतचे लाभार्थी
या योजनेद्वारे २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. जुलै २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ९ हप्त्यांद्वारे प्रत्येक लाभार्थीला १३,५०० रुपये मिळाले आहेत. एकूण २ कोटी ५३ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, आतापर्यंत ३३,२३२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
३६००० कोटींची तरतूद
२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, लाभार्थींची संख्या सातत्याने बदलत आहे, कारण ६५ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ बंद होतो आणि नवीन अर्जांची तपासणीही सुरू आहे. आतापर्यंत ११ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले असून, प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाकडून कसून तपासणी केली जात आहे.
अर्जांची छाननी सुरू
लाडकी बहीण योजनेला पुढे नेणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. निकषात न बसणाऱ्या अर्जांची छाननी सुरू असून, यंदा किती महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार, हे या तपासणीच्या निकालावर अवलंबून आहे. काही महिलांनी स्वतःहून लाभ नको असे अर्ज दिले आहेत, तर काहींचे अर्ज निकषांमुळे बाद होत आहेत. या प्रक्रियेमुळे लाभार्थींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. तरीही, सरकारने सर्व पात्र महिलांना लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.