Maharashtra News : राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गेल्या सुमारे बारा वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे १८ हजार जागा रिक्त आहेत.
प्राथमिक शिक्षकांची ही कमतरता दूर करण्यासाठी आता सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला.
या निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांत येत्या पंधरवड्यात सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करण्यात येणार असून, त्यांना २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यासोबत अन्य कोणतेही लाभ नसतील. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदांसमोर निधीचा पेच निर्माण झाला असल्याचे वृत्त आहे. हे मानधन कुठून द्यावे, याबाबत जिल्हा परिषदा शासनाकडून मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येते.
सेवानिवृत्त शिक्षकांच्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे ठेवण्यात आली आहे. या इच्छुक – शिक्षकांकडून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्ज मागवणार आहेत. कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीकरिता शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर करारनामा करावा लागणार आहे. नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच ही नियुक्ती असेल, असे शासनाने परिपत्रकाद्वारे कळवले आहे.
राज्यातील शिक्षक संख्यास्थिती
राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी आहे. ती २०१९ मध्ये उठवण्यात आली असली, तरी अद्याप शिक्षक भरती सुरू करण्यात आलेली नाही. आजमितीला राज्यातील सर्व खासगी तसेच अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि जिल्हा परिषदांच्या शाळा मिळून शिक्षकांच्या ६१ हजार जागा रिक्त आहेत. एकट्या जिल्हा परिषदांच्या शाळांतील १८ हजार ४६ जागा रिकाम्या आहेत. नियोजित शिक्षक भरतीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे भरतीस विलंब होत असल्याचे सांगण्यात येते.