Maharashtra News :सार्वजनिक गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांविरूद्ध दाखल केलेले गुन्हे लवकरच मागे घेतले जातील, अशी घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने सरकारने केली आहे.
यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला असून ३१ मार्च २०२२ पूर्वी दोषारोपपत्र दाखल झालेल्या खटल्यांसाठी हा निर्णय लागू असेल.

दहीहंडीदरम्यान गोविंदाचा मृत्य झाल्यास १० लाखांचे विमा कवच, दहीहंडीला खेळाचा दर्जा असे निर्णय जाहीर केल्यानंतर आता आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवात आणि दहीहंडी उत्सव काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल गुन्हे लवकरच मागे घेतले जाणार आहेत. मात्र गुन्ह्यांचे स्वरूप पाहून गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
अशा दाखल गुन्ह्यांचे स्वरूप तपासण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा स्तरावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून यामाध्यमातून निर्णय घेतले जातील.
या समितीमार्फत केवळ गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. पाच लाखांपेक्षा कमी नुकसान केलेल्या खटल्यांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.