यात्रेसाठी पाहुणे म्हणून गेले. दुसऱ्यादिवशी नदीत मुलगा पोहोण्यासाठी उतरला. त्याला वाचवायचा प्रयत्नात मामा, माय-लेकरांसह चौघे उतरले, सर्वच भिले व एकमेकांना मिठी मारली, त्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी : बस्तवडे (ता. कागल) येथील वेदगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाला वाचविताना चारजणांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये मामा, माय-लेकरांसह चौघांचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह सापडले असून, एका युवकाचा शोध सुरू आहे.
जितेंद्र विलास लोकरे (वय ३६, रा. मुरगूड, ता. कागल), रेश्मा दिलीप येळमल्ले (३४, रा. अथणी, ता. चिकोडी), हर्षद दिलीप येळमल्ले (१७, रा. अथणी, ता. चिकोडी), सविता अमर कांबळे (२७, रा. रुकडी, ता. हातकणंगले) अशी मृतांची नावे आहेत.
आणूर येथे बुधवारी यात्रेसाठी गुरुदास लोकरे यांच्या घरी नातेवाईक आले होते. यापैकी शुक्रवारी दुपारी तीन वाजता वेदगंगा नदीकाठावर बस्तवडे बंधाऱ्यानजीक जितेंद्र लोकरे, साधना जितेंद्र लोकरे (३०), रेश्मा येळमल्ले, हर्षद येळमल्ले, सविता कांबळे हे कपडे धुण्यासाठी, तसेच अंघोळीसाठी नदीत उतरले होते.
हर्षद हा खोल पाण्यात बुडत असता, त्याने आरडाओरडा केला. यावेळी शेजारीच असणारा जितेंद्र हा त्याचा मामा पाण्यात उतरला आणि त्याच्यापाठोपाठ रेश्मा, साधना व सविताही उतरली. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि भीतीपोटी एकमेकांना सर्वांनीच घट्ट मिठी मारल्याने ते नदीत बुडाले.
तिने डोळ्यादेखत पाहिले..
नदीच्या काठावर आरोही जितेंद्र लोकरे (वय १२) या चिमुकलीने या सर्वांना बुडत असताना पाहिले. ती जोरात आरडाओरडा करीत होती. यावेळी नदीकाठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तवडे येथील अवधूत वांगळे यांनी गावातीलच प्रमोद पाटील याला बोलावून प्रसंगावधान राखत नदीत उड्या घेतल्या साधना लोकरे यांना वाचविण्यात यश आले, तसेच त्यांनी हर्षद वगळता तिघांचे मृतदेह त्यांनी नदीकाठावर आणले.