Maharashtra News : पोलीस अधिकाऱ्याचा खून, गुजरात राज्यात अनेक दरोडे, जबरी चोऱ्या व इतर गुन्ह्यांत गेल्या वीस वर्षांपासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार कर्जत तालुक्यात पकडण्यात पोलिसांना यश आले असून, या कामगिरीने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राजु उर्फ सुदर्शन नारायण पवार, रा. वाळुंज, ता., जि. औरंगाबाद, हा गुजरातमधील सुरत शहर व परिसरामध्ये घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, सारख्या १० पेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता.
सुरत पोलीस त्याचा शोध घेत असताना एके दिवशी सुरत पोलीसांना वरील आरोपी सुरत ग्रामीणमध्ये दरोडा टाकण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलीस फौजफाट्यासह त्याला पकडण्यास गेले.
आरोपी व पोलिसांमध्ये चकमक झाली, या वेळी पोलीसांचा दारुगोळा संपल्याने आरोपीने सहाय्यक फौजदाराच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करून तेथून पळून गेला. त्यावरुन सदर आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यास पकडण्यात पोलिसांना यश आले.
आरोपी राजु उर्फ सुदर्शन नारायण पवार हा खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असताना जेल तोडून फरार झाला होता. त्याच्याविरुध्द अथर्व लाईन पोलीस स्टेशन, सुरत शहर गुजरात राज्य, येथे गुन्हा दाखल होता. आरोपी हा २० वर्षापासून गुजरात पोलीसांना गुंगारा देत होता.
आरोपी कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दुरगाव गावचे शिवारात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांना प्राप्त होताच त्यांनी कोम्बिग ऑपरेशन राबवून सदर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी सुरत शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप,
पो. उप निरी. प्रदिप बोऱ्हाडे, पोहेकॉ. संभाजी वाबळे, पोना. रविंद्र वाघ, पोकाँ. दिपक कोल्हे, महादेव कोहक, लक्ष्मण ढवळे, अमित बरडे, गोरख जाधव, मपोकों राणी पुरी, सेवानिवृत्त सहायक फौजदार अंकुश ढवळे, पोलीस मित्र महेश जामदार यांनी केली आहे.