भावी शिक्षकांचे भविष्य टांगणीला ! शिक्षक भरती प्रक्रिया रखडली; परीक्षा उत्तीर्ण होऊनही करावी लागतेय प्रतीक्षा

Ahmednagarlive24 office
Published:

महाराष्ट्रातील अनेक ज्वलंत प्रश्नांपैकी एक म्हणजे शिक्षक भरती. सध्या राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता भावी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे भविष्य अंधारात दिसत आहे.

शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी, शिक्षक भरतीसाठीची पात्रता परीक्षा प्रतिवर्षी घ्यावी, शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी पालक, भावी शिक्षक, विद्यार्थी करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण विभागाकडे व्यवस्थापन परीक्षा मंडळे, माध्यमिक अनुदानित शिक्षण संस्था, विनाअनुदानित व कायमविना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पहिली ते इयत्ता, सहावी ते आठवी या वर्गात ज्ञानार्जन करण्यासाठी शिक्षण सेवक व शिक्षक भरती करण्यात येते.

मात्र सध्या शिक्षक भरती बंद असल्याने भावी शिक्षक पदासाठी इच्छुक शिक्षक व विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात दिसून येत आहे. एकीकडे, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, व्यवसाय शिक्षण संस्था, पटसंख्येअभावी शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत.

दुसरीकडे, शिक्षकांसाठीची अध्यापक विद्यालये काही अपवाद वगळता पाच-सहा वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे इच्छुक भावी शिक्षकांनी तिकडे पाठ फिरवली आहे. जे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाले आहेत ते अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व्यवसाय शिक्षण संस्था, माध्यमिक अनुदानित शिक्षण संस्था, अनुदानित शिक्षण संस्था, कायम विनाअनुदानित शिक्षण संस्था अशा संस्थांमध्ये अद्याप शिक्षक पदे रिक्त आहेत.

शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी टीईटी आणि टीएआटी या शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून दोन वेळा घेणे अपेक्षित आहे. याआधी २०१७, २०२३ मध्ये ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरती करण्यात आली. त्यानंतर अनेक शिक्षक व भावी शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

मानधनावरील शिक्षक भरती कारण्याची मागणी
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) वर्षातून दोन वेळा किंवा प्रतिवर्षी घेण्यात याव्यात, शिक्षक भरती करण्यात यावी, भावी इच्छुक शिक्षकांना नोकरीची संधी द्यावी, जे शिक्षक निवृत्त होतात. त्या शिक्षकांच्या जागी २० हजार रुपये मानधन देऊन दुसरे निवृत्त शिक्षक भरण्यात येतात.

त्यांची अध्यापन व शारीरिक क्षमता लक्षात घेता मानधनावरील शिक्षक भरती प्रक्रिया बंद व्हावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी भावी शिक्षक विद्यार्थी व पालक वर्ग करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe