अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, १० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल.
असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत.
महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे पाटील म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत महाविकासआघाडी सरकारमधील प्रमुख नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर आले आहेत.
अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ संजय राऊत आणि अनिल परब हे देखील तुरुंगात जातील, असे भाजप नेते सातत्याने सांगत आहेत. सत्ताधाऱ्यांनी केला होता दावा…
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात असल्याचे म्हटले होते.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांवर दबाव वाढवून सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा केला होता.
जेणेकरून यापैकी एक पक्ष भाजपमध्ये जाईल किंवा तिन्ही पक्षांमध्ये फूट पडेल, असे प्रयत्न सुरु असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते.
पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले. तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते.
अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम