Pune Market News : पुणे जिल्ह्यातील भोरच्या आठवडे बाजारात कांदा प्रति किलो २० तर टोमॅटो १२० रुपये दराने विक्री झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच चलती झाली असून बळीराजाने समाधान व्यक्त केले. मात्र, पुन्हा दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.
भोर तालुक्यात मागील हंगामात कांदा काढणी व टोमॅटो तोडणीदरम्यान पावसाचे आगमन झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कांदा ५ तर टोमॅटो १० रुपये प्रति किलो विक्री करावा लागला असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते.
सध्या आठ ते दहा दिवसांपासून बाजारभावात सुधारणा झाली असून टोमॅटोला १२० रुपये तर कांदा प्रति किलो २० रुपयांनी तर कोथिंबीर प्रति गड्डी २५ रुपयांनी विक्री होत आहे. यंदा उन्हाळ्यात भाव नसल्याने अक्षरशः कांदा व टोमॅटो कवडीमोल दराने विक्री करावा लागला होता.
मात्र, पावसाळ्यादरम्यान टोमॅटो, कांद्याचे भाव वाढल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. पुढील काळातही सध्या सुरू असलेल्या प्रमाणेच टोमॅटो, कांद्याला बाजारभाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
कष्टाचे चीज झाले
उन्हाळ्यात कष्ट करून कांदा साठवणूक केला. तर, टोमॅटोची काही दिवस उशिरा लागवड केल्याने फायदेशीर ठरले असून उशिरा का होईना, दरात सुधारणा झाली असल्याने कष्टाचे चीज झाल्याचे समाधान वाटत आहे, असे कांदा विक्रेते संपत सावले यांनी सांगितले.