१४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ साठी अर्ज केल्यानंतर आधारकार्ड बँकेसोबत लिंक न झाल्याने लाभ न मिळालेल्या सुमारे ६ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना या महिन्याच्या अखेरीस योजनेचा लाभ देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जुलै महिन्यात सुरू झाली. सुमारे २ कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज भरले. बँक खात्याशी आधार लिंक असलेल्या महिलांच्या खात्यातच दीड हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र ज्या महिलांचे बँक खाते आधारकार्डशी लिंक नव्हते, अशा महिलांचे अर्ज प्रलंबित राहिले. त्या महिलांनी बँकेशी आधारकार्ड लिंक केल्यानंतरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

महिलांनी त्यानंतर आधारकार्ड बँकेशी जोडण्यास सुरुवात केली होती. महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी सुरू केल्यानंतर आधारकार्ड बँकेशी लिंक केलेल्या सहा लाख महिला नव्याने पात्र ठरल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे उशिराने आधारकार्ड लिक झालेल्या बहिणींना राज्य सरकारकडून दीड हजार रुपये लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जुलै २०२४ मध्ये अर्ज केलेल्या महिलांना ऑगस्ट २०२४ पासून लाभ देण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे अशा महिलांना सहा महिन्यांचा लाभ मिळेल.ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांना मात्र फेब्रुवारी २०२५ चा लाभमिळेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पाच लाख महिलांनी लाभ सोडला
निकषात बसत नसतानाही ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या अर्जाची विभागस्तरावर छाननी सुरू आहेपाच लाख महिलांनी आतापर्यंत स्वतःहून योजनेचा लाभ सोडला आहे.अशांकरिता स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. मात्र योजनेतून बाद झालेल्या एकाही महिलेकडे सरकारकडून पैसे परत मागितले जाणार नाहीत, असेही हा अधिकारी म्हणाला.
महिन्याला ३६०० कोटी खर्च
‘लाडकी बहीण योजने ‘साठी महिन्याला ३ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च आहे.जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळाला.निकषात न बसलेल्या सुमारे पाच लाख ‘लाडक्या बहिणी’ योजनेतून बाद झाल्या. दुसरीकडे प्रलंबित महिलांची संख्या वाढली आहे.त्यामुळे हा खर्च पेलवणार कसा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.