Maharashtra News : गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्या करून मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ते प्रवास करून गाव गाठण्याच्या मनःस्थितीत असलेल्या कोकणातील चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर होणार असून मुंबईकरांचा कोकण प्रवास खड्डेमुक्त अर्थातच निर्विघ्न पार पडणार आहे.
त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दंड थोपटले आहेत. इंदापूर ते झारापदरम्यान सुमारे ३५० किमीपैकी केवळ दीड किलोमीटरच्या टप्यातील खड्डे बुजवणे बाकी आहे. येत्या काही दिवसांत हे सर्व खड्डे बुजवले जातील, अशी हमीच महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली आहे. त्यामुळे चाकरमान्यांची लवकरच या महामार्गावरील खड्ड्यांच्या त्रासातून सुटका होईल.
मुंबई-गोवा महामार्गाच्या ( एनएच-६६ ) चौपदरीकरणाला होणारा विलंब आणि मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील अॅड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे.
या महामार्गावर पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. महामार्गाची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नसल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. याचबरोबर महामार्गाच्या चौपदरीकरणाची कासवगती, प्रवासी सुरक्षेच्या उपाययोजनांची कमतरता असल्याकडे याचिकेतून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.
मागील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने इंदापूर ते झाराप या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था प्रत्यक्ष जाऊन पाहण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाची सद्यस्थिती जाणून घेतली.
या पाहणीत आलेली परिस्थिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली आहे. इंदापूर ते झारापदरम्यानच्या ३५० किमीच्या मार्गावर सद्यस्थितीत एकही खड्डा नाही.
उर्वरित केवळ दीड किलोमीटर अंतरावर खड्डे आहेत. तेही लवकरच बुजवले जातील, अशी हमी देणारे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयात दाखल केले आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी ९ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत सरकार उदासीन असल्याचे गांभीर्य विचारात घेऊन न्यायालयाने मागील सुनावणीवेळी सरकारला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
तसेच दंडाची रक्कम याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या दणक्यानंतर सरकारला जाग आली आणि संपूर्ण महामार्गाचा आढावा घेऊन अहवाल सादर करून गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्ता करण्याची हमी दिली आहे