Maharashtra News:हनुमाव चालिसा वाचनामुळे चर्चेत आलेल्या अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावतीमध्ये अनोखी दही हंडी आयोजित केली आहे.
मात्र, त्यातील रक्ततुला हा उपक्रम वादग्रस्त ठरल्याने त्यांना रद्द करावा लागला. राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची दहीहंडी रविवारी २१ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करण्यात येणार होती. मात्र, प्रोटोकॅालमुळे ती रद्द करण्यात आली आहे.
मात्र, फडणवीस यांच्या वजनाएवढे रक्त संकलित केले जाणार आहे. दरम्यान, या रक्ततुलामुळे उपक्रमावरून राणा यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, रक्ततुलाच्या माध्यमातून फडणवीसांना खूष करण्यासाठी आणि रवी राणा यांची मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून नवनीत राणांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मंत्रिपद मिळवण्यासाठी राणांना आणखी काय काय करावे लागेल सांगता येत नाही. टीका झाल्यानंतर फडणवीस यांना प्रत्यक्ष तराजूत न बसविता त्यांच्या वजनाएवढे रक्त संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.