१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : सत्तेसाठी २०१९ मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला आणि शिवसेनेला पराभूत केले.आता आभाळ फाटले आहे त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार ? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी खिल्ली उडवली. शिवसेनेच्या (ठाकरे) मुंबईत होणाऱ्या डॅमेज कंट्रोल बैठकीची खिल्ली उडवली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये ‘खुर्ची’ चाच अजेंडा राबवला गेला.महायुतीने सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा, त्यांना न्याय देण्याचा, राज्याला पुढे नेण्याचा अजेंडा राबवला.महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच ‘वॉर रूम’ आहे. शिवसेनेची नवी ‘वॉर रूम’ नाही.

शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी फक्त समन्वय कक्षाची स्थापना केली आहे.महायुतीत कोणतेही शीतयुद्ध नाही.३१ ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आली.महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आज प्रयागराज दौरा
शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह बुधवारी प्रयागराजला महाकुंभात स्नान करणार आहेत.साधू संत-मंहतांचे दर्शनही ते घेणार आहेत.बुधवारी सकाळी ८ वाजता विमानाने मुंबईहून ते प्रयागराजला जाण्यास निघतील.सकाळी ११ वाजता महाकुंभ घाटावर पोहोचतील.दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी शाहीस्नान आटोपून प्रयागराज विमानतळाकडे प्रयाण करतील.दुपारी दीड वाजता प्रयागराजहून मुंबईकडे येण्यास निघतील.शिंदे यांच्या सोबत सेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी असणार आहेत.