Maharashtra News : ऊस दराच्या भूलभुलैयातून शेतकऱ्यांची अनेकदा फसवणूक झाली. अतिरिक्त ऊस असला की विल्हेवाटीसाठी ज्ञानेश्वरची मदत तुमच्या संकटकाळात आम्ही, मग आमच्या संकटकाळात तुम्ही का नसणार यासाठी अंतर्मुख व्हा?
कारण ज्ञानेश्वर कारखाना फक्त साखर उद्योगच नाही, तर तुमचे प्रपंचही चालवतो, अशी भावनिक साद ऊस उत्पादकांना ज्ञानेश्वर कारखान्याचे पदाधिकारी गावोगावी घालताना दिसत आहेत.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/11/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-11-14T122010.266.jpg)
ऊस मिळवण्यासाठी नेवासे तालुक्यात सहकारी व खासगी मिळून तोडणी कामगारांच्या साठहून अधिक टोळ्या कार्यरत झाल्या. दिवाळीनंतर आणखी टोळ्या येण्याची शक्यता आहे.
ऊस उत्पादकांना आकर्षित करण्यासाठी आता अधिक ऊस दराचे गाजर दाखवले जात आहे. यापूर्वीही काही कारखानदारांनी अधिक ऊस दर देणार असल्याचे सांगत ऊस नेला. पण पुढे ऊस उत्पादकांची रक्कमा घेताना फसवणूक झाल्याचीही उदाहरणे आहेत.
दराच्या भूलभुलैयाला बळी पडून कसा पश्चाताप होतो, याची आठवण आता उत्पादकांना करून दिली जात आहे. ज्या ज्या वेळी अतिरिक्त ऊस झाला की उत्पादकांना ज्ञानेश्वर कारखाना सहकार्य करत आला आहे.
एवढेच काय पण अतिरिक्त ऊस ज्ञानेश्वर मार्फत इतर कारखान्यांना देण्यात येतो, अशावेळी ज्ञानेश्वर रकमेची हमी घेत असतो. ज्ञानेश्वर कारखान्याला इतर कारखान्यांना घातलेल्या उसाची रक्कम मिळवण्यासाठी प्रसंगी न्यायालयाचेही दरवाजे ठोठावे लागले.
त्यासाठी शेतकऱ्यांच्या रकमा देण्यासाठी ज्ञानेश्वरला न्यायालयीन भुर्दंड सोसावा लागला. केवळ शेतकऱ्यांशी व परिसर बांधिलकी म्हणून ज्ञानेश्वर धावून गेला. असे असताना मग आता ऊस मिळवण्याच्या स्पर्धेत बाहेरील कारखाने तालुक्यात आले, तर आपला कारखाना आपले हित ही जबाबदारी ऊस उत्पादकांची नाही का, हा सवाल कारखाना करत आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी अधिक ऊस दराच्या अमिष्याने ऊस उत्पादकांची अनेकदा फसवणूक केली जाते, अशा फसवणुकीचा अनुभव ऊस उत्पादकांना आलेला आहे. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वरचा व्यवहार चोख आहे.
शिवाय आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे. हा कारखाना सुरू असला की बाजारपेठा फुलतात. शेतकरी, सभासदांना विश्वासपात्र असे आमचे काम असल्याने ऊस उत्पादक भूलभुलैयाना बळी पडणार नाहीत.
ज्ञानेश्वर लाच ऊस घालतील, असा विश्वास आहे. कारण अतिरिक्त ऊस घालताना शेतकऱ्यांची फरफट झाली. अपमान झाला. अशावेळी ज्ञानेश्वरच मदतीला आला. या कारखान्याची उभारणीच ऊस घालण्यासाठी हतबल शेतकऱ्यांचे हाल बघून, यातूनच दिवंगत लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी केली, असे त्यांनी सांगितले.