सातारा जिल्ह्यावर सूर्य कोपला; उष्णतेची दाहकता जिवावर..!, ऊन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला दोघांचे बळी; पारा चाळिशीपार

Published on -

कराड: यंदाच्या उन्हाळ्यात सूर्य जिल्ह्यावर प्रचंड कोपला आहे. उष्णतेची दाहकता वाढल्याने जिल्ह्यात उष्माघाताने दोन शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. चाळिशी पार असणारा पारा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे उष्माघाताचा धोका आता वाढू लागला आहे. भरऊन्हात काम करणाऱ्यांनी जास्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. यंदा उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे संतुलित आहार आणि पाण्याचे प्रमाण वाढविण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

शेतकऱ्यांसह अनेक कष्टकरी भर उन्हात दिवसभर राबत असतात. उन्हात केलेल्या कष्टामुळे त्यांना थकवा जाणवतो. अगदी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते भरउन्हात काम करतात. त्यामुळे ऊष्माघाताचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. आग होणाऱ्या उष्णतेमुळे जावळी व मान तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने उन्हापासून संरक्षणाची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे बनले आहे.

सध्या एप्रिल महिन्याच्या शेवटी अंग भाजून काढणारा उन्हाचा चटका बसत असल्यामुळे शरीरात अपायकारक बदल घडून येत आहेत. परिणामी उष्माघात टाळण्यासाठी संतुलित आहार आणि पाण्याचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. ऊन दिवसेंदिवस वाढणार असल्यामुळे भरऊन्हात कष्टाची कामे टाळावीत, असेही आहार तज्ज्ञ सांगतात.

उष्माघाताचा परिणाम

शरीराचं तापमान वाढलं की रक्त तापू लागतं. स्नायू कडक होतात. श्वास घेण्यासाठी लागणारे स्रायूही निकामी होतात. रक्तातील पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होत जाते. रक्तदाब कमी होतो. महत्त्वाच्या अवयवांचा विशेषतः मेंदूचा रक्त पुरवठा थांबतो. आणि एक-एक अवयव अवघ्या काही क्षणात बंद पडतात.

उष्माघात म्हणजे काय?

शरीरात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होणे, हे धोक्याचे लक्षण आहे. कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याचा साठा कमी होऊ लागतो. तसेच शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं. याचवेळी शरीराचे तापमान ३८.१ अंश किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यास उष्माघात होतो. म्हणजेच मृत्यू ओढवतो.

… अशी घ्यावी काळजी

१) भरदुपारी घरात अथवा सावलीच्या ठिकाणी थांबावे.
२) दुपारी साडेबारा ते चार या कालावधीत थेट सूर्यप्रकाशात जाऊ नये.
३) घराबाहेर पडताना पूर्ण बाहीचे कपडे घालावेत.
४) डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी असावी.
५) सुती कपड्यांचा वापर करावा.
६) उन्हात गॉगल आणि छत्रीचा वापर करावा.

…ही आहेत उष्माघाताची लक्षणे

१) त्वचा कोरडी आणि लाल होते.
२) डोळ्यांच्या पापणीच्या त्वचेचा रंग बदलतो.
३) ओठाला सूज चढून ओठ कोरडे पडतात.
४) शरीरातून घाम येणे बंद होते.A
५) अचानक चक्कर येऊ लागते.
६) शरीरावर लहान-मोठे पुरळ येतात.
७) मोठ्या प्रमाणावर मळमळ जाणवते.
८) डोकेदुखी तसेच पोटदुखी जाणवते.
९) हृदयाचे ठोके वेगाने पडतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe