Dummy School | डमी शाळांमध्ये प्रवेश घेऊन नियमित वर्गात न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या काळात मोठा फटका बसणार आहे. CBSE मंडळाने अशा विद्यार्थ्यांना 12वी बोर्ड परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्याचा विचार सुरू केला आहे. हा निर्णय 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं, डमी शाळांचा आधार घेणाऱ्या आणि केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा झटका ठरू शकतो.
CBSEने स्पष्ट केले आहे की, शाळांमध्ये नियमित उपस्थित राहणं अनिवार्य आहे आणि यासाठी किमान 75% उपस्थिती आवश्यक असणार आहे. ही उपस्थिती पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देण्याची परवानगी नाकारली जाईल. केवळ नावनोंदणीसाठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्थिती धोक्यात येणार असून, त्यांच्या पालकांनाही जबाबदार धरलं जाईल.

डमी शाळांसाठी मोठा निर्णय-
CBSEच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा उपनियमांमध्ये बदल करताना डमी शाळांमध्ये नावनोंदणी करून नियमित वर्गात गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता NIOS (राष्ट्रीय मुक्त विद्यालयी संस्था) परीक्षेची वाट धरावी लागेल. अत्यावश्यक परिस्थिती जसे की गंभीर वैद्यकीय आपत्कालीन घटना, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग, अशा काही मर्यादित कारणांसाठीच 25% उपस्थितीत सूट दिली जाण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर अशा विद्यार्थ्यांना परवानगी देणाऱ्या शाळांनाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अशा शाळांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, यावर सध्या मंडळ विचार करत आहे.
जेईई-नीट तयारी करणाऱ्यांना फटका?
खासगी क्लासेसकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय फार कठीण ठरेल. जेईई आणि नीटसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेश घेऊन वर्गांना टाळतात. मात्र CBSEने घेतलेला निर्णय त्यांच्या अभ्यासाच्या सवयींवर मोठा परिणाम करेल. यामुळे विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये उपस्थित राहूनच शिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे. शाळांमधील वातावरण, शिस्त आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे.
राज्य मंडळानेही अशाच प्रकारचा निर्णय घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, असा सल्लाही शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे शिक्षकही अभ्यासक्रमामध्ये नव्याने अपडेट राहतील आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल.