१४ जानेवारी २०२५ केज : प्रशासनाने आणि सरकारने आरोपी नव्हे तर देशमुख कुटुंबाला सांभाळायला हवे.मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय देशमुख कुटुंबीयांना शब्द दिला होता की, खंडणीतील आणि खुनातील आरोपींना सोडले जाणार नाही.आता मुख्यमंत्र्यांनी थेट कारवाई करून दाखवावी.या प्रकरणातील आरोपी सुटले तर आम्ही त्यांचे जगणे मुश्कील करू,राज्य बंद पाडू,असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
मस्साजोग येथे सोमवारी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.ही माहिती मिळताच त्यांनी मस्साजोगमध्ये धाव घेतली. ‘धनंजय तुमची या कुटुंबाला गरज आहे तुम्ही असा टोकाचा निर्णय घेऊ नये.भावाला न्याय द्यायची जबाबदारी तुमची आहे.तुम्ही आत्महत्या करू नका,’ असे कळकळीचे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, धनंजय देशमुख यांनी केलेल्या मागण्या मनावर घेऊन त्यातून मार्ग काढावा,ही आमची प्रशासनाला विनंती आहे. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.बहुतेक तपास यंत्रणांचे हात बांधलेले आहेत,असा संशय येत आहे.त्यामुळे आता सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर टाकावी लागणार आहे.तपासाच्या संदर्भातील माहिती द्यायला हवी आहे.या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती का केली नाही ? असा सवाल करत गुन्हेगारांची गाडी खराब होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते,असा आरोपही यावेळी मनोज जरांगे यांनी केला.
महिलांनी पोलिसांच्या दिशेने भिरकावल्या बांगड्या
संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना मकोका लावण्यात यावा. या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असून त्यालाही हत्या आणि मकोका अंतर्गत अटक करून कारवाई करावी, यासाठी सोमवारी सकाळी संतोष देशमुख यांचे लहान भाऊ धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढले होते.
त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अप्पर अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे आंदोलनस्थळी येताच काही
महिलांनी आक्रमक पवित्रा घेत हातातील बांगड्या पोलिसांच्या दिशेने भिरकावत संताप व्यक्त केला.
या खंडणी प्रकरणाशी संबंधित कराड याला संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक करून त्याच्यावरही ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात यावी.तसेच फरार आरोपी कृष्णा आंधळे यालाही तत्काळ अटक करण्यात यावी.पोलीस वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी त्याच्यावर कारवाई करीत नाही,असा आरोप गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनावर केला आहे.