Maharashtra News : पावसाळा सुरू होवून तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून अजूनही कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. राज्यासह मतदार संघावर दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यामुळे देवा आता तरी चांगला पाऊस पडू दे, अशी प्रार्थना आमदार आशुतोष काळे आज गुरुवारी (दि.७) रोजी माहेगाव देशमुखच्या ग्रामदैवत दत्तात्रयाला करणार आहे.
पर्जन्य छायेखाली असलेल्या कोपरगाव मतदार संघावर वरून राजाने यावर्षी जास्तच खपामर्जी केल्यामुळे संपूर्ण मतदार संघावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. खरीपाची पिके पूर्णपणे जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता तर वाढल्याच आहेत. परंतु हीच परिस्थिती पावसाळा संपेपर्यंत अशीच राहिली, तर रब्बी हंगामाचे भवितव्य देखील धोक्यात येणार आहे.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-09-08T182220.982.jpg)
यापुढे देखील अशीच परिस्थिती राहिली, तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होणार आहे.
पावसाळा संपण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. या दिवसात जास्तीत जास्त पर्जन्यमान होवून बळीराजा सुखी व्हावा, यासाठी मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी आपापल्या गावातील धार्मिक स्थळी ग्रामदैवताची पाऊस पडावा, यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन आ. काळे यांनी केले आहे.