Housing News : देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ४० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या परवडणाऱ्या घरांची विक्री या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून) १८ टक्क्यांनी घट झाली आहे. या कालावधीमध्ये ४६ हजार ६५० घरांची विक्री झाल्याचे रिअल इस्टेट सल्लागार कंपनी ॲनारॉकने एका अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत या किमतीच्या श्रेणीतील ५७ हजार ६० घरांची विक्री झाली होती.
अहवालानुसार, एकूण निवासी विक्रीत परवडणाऱ्या घरांचा वाटा गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत ३१ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर घसरला आहे. एकूण घरांची विक्री मागील वर्षीच्या १ लाख ८४ हजार घरांवरून यावर्षी पहिल्या सहामाहीत २ लाख २८ हजार ८६० घरांवर गेली आहे.
कोविड महामारीनंतर मागणीतील बदल आणि विकासक तसेच ग्राहकांना भेडसावणाऱ्या इतर अनेक आव्हानांमुळे एकूण विक्रीत परवडणाऱ्या घरांचा वाटा कमी झाला. जमिनीचे वाढलेले भाव आणि विकासकांसाठी त्यांची उपलब्धता कमी होत आहे.
जमीन जास्त भावाने विकत घेतली तरी कमी किमतीत विकणे त्यांना शक्य नाही, असे अॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले. सर्वेक्षण केलेल्या शहरांमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर), बंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता यांचा समावेश आहे.