शिवसेना-राष्ट्रवादीचं हे ठरतंय, काँग्रेसचं काय?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics : देशभरात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाराष्ट्रातही आघाडी करण्याचे ठरविले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढविण्याचे ठरत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, महाविकास आघाडीचा तिसरा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसची या संबंधीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकर होत आहेत.

या निवडणुकीत भाजपकडून जोर लावला जात असतानाच आता शिवसेना-राष्ट्रवादीकडून युतीचे संकेत मिळत असल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात यासंबंधी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. पवार यांनी कर्नाटक दौऱ्यावर असताना केलेल्या एका विधानामुळे याला पुष्टी मिळत असल्याचे सांगण्यात येते.

‘भाजपच्या विरोधातील पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर आम्हाला तसे लेखी कळवले आहे.

याचा पुढाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत.

इतर नेत्यांशी बोलून आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले. यावरून आता राज्यातील आगामी निवडणुकांतही हे दोन पक्ष एकत्र राहण्याचा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे. मात्र, काँग्रेसची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe