रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीच्या वाटपाची आणि त्यांच्या इच्छापत्राची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. विशेषतः मुंबईतील कुलाबा येथील समुद्रकिनारी वसलेल्या त्यांच्या आलिशान ‘हलेकई’ बंगल्याबाबत सध्या सर्वत्र उत्सुकता आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा या बंगल्यात राहण्यासाठी येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नोएल टाटा राहायला येण्याची शक्यता
काही अहवालांनुसार, नोएल टाटा आणि त्यांचे कुटुंब कफ परेड येथील विंडमेरे या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानाऐवजी हलेकई येथे स्थलांतरित होण्याचा विचार करू शकतात. रतन टाटा यांनी आपल्या आयुष्याचे शेवटचे काही वर्षे याच बंगल्यात घालवली होती, ज्यामुळे या मालमत्तेचे भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व आणखी वाढले आहे.

२०१२ पासून रतन टाटा राहत होते
हलेकई हा बंगला 13,350 चौरस फुटांच्या भूखंडावर उभा आहे आणि चार मजली रचनेत बांधलेला आहे. याची मालकी टाटा सन्सच्या पूर्ण स्वामित्वाखालील उपकंपनी असलेल्या इवार्ट इन्व्हेस्टमेंट्सकडे आहे. 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यावर रतन टाटा यांना हा बंगला राहण्यासाठी देण्यात आला होता.
या काळात ते आपल्या जर्मन शेफर्ड कुत्र्यांसह आणि घरातील कर्मचाऱ्यांसमवेत येथे राहत होते. याच बंगल्यातून त्यांनी टाटा ट्रस्टच्या सामाजिक कार्यांना दिशा दिली. रतन टाटा यांनी स्वतः आर्किटेक्ट रतन बाटलीबोई यांच्या सहाय्याने हा बंगला डिझाइन केला होता, ज्यामुळे याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक मिळते.
ग्रंथालय, इन्फिनिटी पूल, आलिशान फ्लोअरिंग
हलेकई बंगल्याची रचना आणि सुविधा यामुळे तो मुंबईतील सर्वात आलिशान निवासस्थानांपैकी एक मानला जातो. समुद्राकडे दिसणारा हा बंगला सनडेक, इन्फिनिटी पूल, खाजगी ग्रंथालय आणि समुद्राच्या विहंगम दृश्यांसह बेडरूम्स आणि प्लेरूमने सुसज्ज आहे.
बंगल्यातील भव्य जिना, आलिशान फ्लोअरिंग आणि इनडोअर प्लांट्स यामुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलते. याशिवाय, बेसमेंटमध्ये 15 गाड्या पार्क करण्याची सोय आहे, जी या बंगल्याच्या वैभवाची साक्ष देते. अंदाजे 150 कोटी रुपये किमतीचा हा बंगला रतन टाटा यांच्या साध्या परंतु परिष्कृत जीवनशैलीचे प्रतीक आहे.
नोएल टाटा सध्या कुठे राहतात?
नोएल टाटा यांच्या हलेकईत स्थलांतराच्या शक्यतेबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. नोएल टाटा सध्या त्यांच्या पत्नी आलू मिस्त्री आणि कुटुंबासह कफ परेड येथील विंडमेरे या सहा मजली इमारतीत राहतात. ही इमारत आलू मिस्त्री आणि त्यांची बहीण लैला जहांगीर यांना त्यांचे वडील आणि शापूरजी पालोनजी समूहाचे माजी अध्यक्ष पालोनजी मिस्त्री यांच्याकडून वारसाहक्काने मिळाली आहे.
विंडमेरेमधील प्रत्येक मजला सुमारे सहा हजार चौरस फुटांचा आहे, आणि आलू मिस्त्री यांच्या मालकीचे सहा फ्लॅट येथे आहेत. काहींच्या मते, नोएल टाटा आपल्या सध्याच्या निवासस्थानात समाधानी असल्याने हलेकईत लगेच स्थलांतरित होणार नाहीत, परंतु भविष्यात ते हा पर्याय निवडू शकतात.
हलेकईबाबत इच्छापत्रात उल्लेख नाही
रतन टाटा यांच्या इच्छापत्रात हलेकई बंगल्याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यांच्या संपत्तीच्या वाटपात त्यांनी आपल्या सावत्र बहिणी, भाऊ जिमी टाटा, जवळचे मित्र आणि टाटा ट्रस्ट यांच्यासाठी तरतुदी केल्या आहेत, परंतु हलेकईच्या भवितव्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही.
काही सूत्रांचे म्हणणे आहे की, हलेकई रिकामा ठेवण्याऐवजी त्याचा उपयोग व्हावा, यासाठी नोएल टाटा येथे येण्याचा विचार करू शकतात. दुसरीकडे, टाटा समूहाच्या इतर मालमत्तांच्या इतिहासाकडे पाहता, जेआरडी टाटा यांचा ‘द केर्न’ आणि नवल टाटा यांचा जुहू बंगला यांसारख्या मालमत्ता रिकाम्या राहिल्या किंवा त्यांचा वापर टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे हलेकईच्या भवितव्यासंदर्भात अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.