महाराष्ट्रात एक असे हिल स्टेशन आहे, जे भारतातील सर्वात धोकादायक मानले जाते आणि तिथे कोणत्याही वाहनाला प्रवेश नाही. मग तो कितीही मोठा श्रीमंत असो किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच असो, त्यालाही पायी चालावे लागेल. हे ठिकाण आहे माथेरान, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटे हिल स्टेशन. इथे वाहने दूर ठेवून, पायी फिरतच या निसर्गरम्य स्थळाचा आनंद घ्यावा लागतो.
वाहनांना बंदी
माथेरान हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. यामुळे ते प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये २६०० फूट उंचीवर वसलेल्या या ठिकाणी वाहनांना पूर्णपणे बंदी आहे. समुद्रसपाटीपासून ८०३ मीटर उंचीवर असलेले माथेरान नेरळच्या घाटमार्गे पोहोचता येते.

मुंबईहून बदलापूर-कर्जत मार्गाने नेरळपर्यंत वाहनाने जाता येते, पण तिथून पुढे माथेरानच्या हद्दीत वाहने थांबवावी लागतात. यानंतर पर्यटकांना पायी चालणे, ढकलगाडी किंवा घोड्यावरून प्रवास करणे असे पर्याय उपलब्ध आहेत. अनेकजण पायी चालत निसर्गाच्या सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेतात.
टॉय ट्रेन माथेरानचे आकर्षण
माथेरानचा शोध १९व्या शतकात ठाण्याचे जिल्हाधिकारी ह्यू पॉईंटझ मॅलेट यांनी लावला. ब्रिटिश राजवटीत हे ठिकाण उन्हाळ्यात त्यांचे आवडते निवासस्थान होते. पुढे माथेरानला हिल स्टेशन म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१५ एप्रिल १९०७ रोजी नेरळ ते माथेरान दरम्यान टॉय ट्रेन सुरू झाली. २१ किलोमीटरचा हा छोटा मार्ग निसर्गरम्य घाटातून आणि शेकडो वळणांमधून जातो, ज्यामुळे ही सफर अविस्मरणीय ठरते. टॉय ट्रेन हे माथेरानचे प्रमुख आकर्षण आहे, परंतु पावसाळ्यात घाटात दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे ही सेवा बंद ठेवली जाते.
माथेरानमधील खास ठिकाणे
माथेरानमध्ये अनेक नयनरम्य पॉइंट्स आहेत. इको पॉइंट, लुइसा पॉइंट, चार्लोट झील, मंकी पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, लॉर्ड पॉइंट आणि सनसेट पॉइंट ही काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
रेल्वेने जायचे असल्यास नेरळ हे जवळचे स्टेशन आहे. नेरळला उतरून माथेरान गाठता येते. एका दिवसात माथेरान पूर्णपणे पाहणे शक्य नाही. येथे राहण्यासाठी अनेक छोटी-मोठी हॉटेल्स उपलब्ध आहेत, जिथे एक-दोन दिवस निसर्गाच्या कुशीत राहण्याचा आनंद घेता येतो. माथेरान हे त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.