महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेले एक राज्य भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. हे राज्य म्हणजे गोवा, ज्याला पर्यटकांचे स्वर्ग म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असलेल्या गोव्यात केवळ दोन जिल्हे आहेत – उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. तरीही, या छोट्या राज्यात पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणे आहेत.
ज्यामुळे देश-विदेशातून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. गोव्याचे निसर्गसौंदर्य, शांत समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू आणि उत्साही रात्रजीवन यामुळे ते जगभरात लोकप्रिय आहे.

पर्यटकांचे आवडते ठिकाण
गोवा हे महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर वसलेले आहे आणि पर्यटनासाठी एक अग्रगण्य ठिकाण मानले जाते. येथील लांबलचक समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, चर्च आणि किल्ले पर्यटकांना भुरळ घालतात. क्रूझवरून समुद्रसफर आणि रात्रीच्या पार्ट्या यांसाठी गोवा विशेष प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक किनारा आणि ठिकाण पर्यटकांना वेगळा अनुभव देतो, मग तो शांततेत वेळ घालवण्याचा असो किंवा रोमांचक जलक्रीडांचा.
गोव्याची खास ठिकाणे
अग्वाडा किल्ला- १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला गोव्यातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेला हा किल्ला ऐतिहासिक आणि निसर्गसौंदर्याचा संगम आहे.
कोल्वा बीच- दक्षिण गोव्यातील हे समुद्रकिनारे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे अनेक बार, नाइटक्लब आणि पोर्तुगीज शैलीतील घरे पाहायला मिळतात. पॅराग्लायडिंग, जेट स्कीइंग, स्नॉर्कलिंग आणि बनाना बोट राइड यांसारख्या जलक्रीडांचाही आनंद येथे घेता येतो.
अरामबोल बीच- उत्तर गोव्यातील हे किनारे शांतता आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
बागा बीच- रात्रीच्या जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर बागा बीच हे गोव्यातील सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील चैतन्य आणि उत्साह पर्यटकांना आकर्षित करतो.
अंजुना बीच- गोव्यातील सर्वात प्रसिद्ध किनाऱ्यांपैकी एक, अंजुना बीचला ‘गोल्डन बीच’ असेही म्हणतात. येथील सोनेरी वाळू आणि सुंदर दृश्ये पर्यटकांचे मन मोहून टाकतात.
बटरफ्लाय बीच- दक्षिण गोव्यातील पालोलेमजवळ असलेला हा किनारा रोमँटिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. याला ‘हनीमून बीच’ असेही संबोधले जाते.
दूधसागर धबधबा- ३१० मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. हा गोव्यातील निसर्गाचा अनमोल ठेवा आहे.
गोवा हे छोटे असले तरी त्याचे वैशिष्ट्य आणि आकर्षण अफाट आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या या राज्याने आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीने जगभरात नाव कमावले आहे. दोनच जिल्ह्यांत सामावलेले हे राज्य पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरते.