Maharashtra News:नवीन सरकारच्या काळात आणि कोविडची लाट सरल्यानंतर येणारा पहिलाच गणेशोत्सव धुमधडक्यात साजरा करता येणार आहे. त्यासाठी अनेक निर्बंध हटवून गणपती मंडळांच्या सोयीचे निर्णय नव्या सरकारने घेतले आहेत.
कोविड काळात लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम असे सर्व सण-उत्सव पूर्वीप्रमाणेत उत्साहात साजरे करता येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यासंबंधी आज मुंबईत महत्वाची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. त्यानुसार यावर्षी गणपतीच्या मूर्त्यांची उंचीवर कोणतीही मर्यादा नाही. मूर्तिकारांची ही मागणी असल्याने निर्णय घेण्यात आला आहे.
जेथे जशी जागा उपलब्ध असेल, त्या नुसार मूर्तींची उंची ठेवता येणार आहे. उत्सवातील ध्वनिप्रदूषणासंबंधी आलेल्या तक्रारी तपासून पाहिल्या जाणार आहेत. यासंबंधीच्या किरकोळ तक्रारी मागे घेण्याची कार्यवाही पोलिस विभागामार्फत करण्यात येणार आहे.
गणेश मंडळांना मंडप परवानगी सुटसुटीत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे. उत्सव साजरा करताना सामाजिक भान हवे, मात्र नियमांचा बागुलबुवा करण्यात येऊ नये, अशा सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.