३ जानेवारी २०२५ डोणगाव (बुलढाणा) : जालना जिल्ह्यातील महाकाळा फाट्याजवळ उभ्या ट्रकवर कार आदळून शेलगाव देशमुख येथील भागवत चौरे यांच्यासह मुलगा व मुलगी तसेच नात्यातील कुटे परिवारातील त्यांची मामी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अख्ख्या जिल्हा हळहळला असून, शेलगाववासीय शोकाकूल झाले आहेत.
१ जानेवारीच्या रात्री बाराच्या सुमारास वडील भागवत यांच्यासह मुलगी सृष्टी आणि मुलगा स्वराज यांच्या पार्थिवावर एकाच सरणावर भडाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.तर अनिता कुटे यांच्यावरही शेजारी अंत्यविधी करण्यात आला.यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याने शेलगाव देशमुख येथे एकाही कुटुंबात चूल पेटली नाही. या घटनेमुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.डोणगावपासून जवळच असलेल्या शेलगाव देशमुख येथील रहिवासी असलेले परसराम कुटे (५५) हे छत्रपती संभाजीनगर येथे एका कंपनीत आहेत.
तर त्यांचा भाचा भागवत यशवंत चौरे (३८) यांचे वाहन एका कंपनीत लावण्यात आले आहे. त्यामुळे ते कुटुंबीयांसह जालना येथे वास्तव्याला होते. परसराम कुटे यांचा मुलगा सुबोध हा इंजिनीअर असून, तो हैदराबाद येथे नोकरी करतो. १ जानेवारी रोजी सुबोधला सोडविण्याकरिता चौरे व कुटे कुटुंब पुणे येथे गेले होते.
तेथून परतताना तुळजापूर येथे देवदर्शन करून परतीच्या मार्गाने निघाले. मामा परसराम व मामी अनिता यांना संभाजीनगर येथे सोडून परत जालना येथे येणार होते. मात्र, जालना जिल्ह्यात सोलापूर ते धुळे महामार्गावर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात येणाऱ्या महाकाळा फाटा येथे दुपारी नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांची होंडा सीटी कार (क्रमांक एमएच-२०-सीएस-६०४१) मागून धडकली.
या भीषण अपघातात अनिता परसराम कुटे (५०), भाचा भागवत यशवंत चौरे (३८), भागवत यांचा मुलगा स्वराज (८) व मुलगी सृष्टी (१४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भागवत यांचे मामा परसराम कुटे व पत्नी छाया भागवत चौरे (३५) हे गंभीर जखमी झाले.
आजोबांनी दिला मुखाग्नी
चौरे कुटुंबातील वडिलांसह मुलगा व मुलगी तसेच कुटे परिवारातील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समजताच शेलगाव देशमुख गावावर शोककळा पसरली. चौघांचे मृतदेह मूळगावी शेलगाव देशमुख येथे रात्री साडेअकरा वाजता आणण्यात आले.
यावेळी एकच अश्रूकल्लोळ उडाला. यावेळी सर्व गाव जागी होते. बापलेकांना एकाच सरणावर मुखाग्नी देण्याची दुर्दैवी वेळ वृद्ध आजोबांवर यशवंत चौरे यांच्यावर आली.तर अनिता कुटे यांच्या पार्थिवाला दिराने अग्नी दिला.