Konkan Railway : शनिवारी पनवेल जवळ मालगाडी घसरून झालेल्या अपघातानंतर कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. रविवारी दिवसभर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. रायगड जिल्ह्यातील विविध स्थानकांमध्ये गाड्या तासन्तास अडकून पडल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
शनिवार रात्रीपासूनच या अपघाताचा कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. कोकणातून येणाऱ्या गाड्या उशिराने सुटल्या. रविवारी सकाळपासून कोकण कन्या एक्स्प्रेस वीर स्थानकात, तर करमाली पनवेल गणपती विशेष गाडी माणगाव स्थानकात थांबली.
रायगडमधील करंजाडी, विन्हेरे, नागोठणे अशा विविध स्थानकांत गाड्या उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तासन्तास वाट पाहिल्यानंतर रेल्वेकडून गाडी सुटण्यासंदर्भात कुठलीच सूचना मिळत नव्हती.
त्यामुळे अनेक प्रवाशांनी पायपीट करत महामार्गावरून जाणाऱ्या एसटी बसेस आणि वाहनांच्या सहाय्याने मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनाही तिष्ठत उभे राहावे लागले
प्रवाशांचा संताप
या गाड्या स्थानकात ७ ते ८ तास थांबल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे महिला प्रवाशांची फारच कुचंबणा होत होती. वृद्ध आणि लहान मुलांचे हाल झाले.
रेल्वेने कुठलीच पर्यायी व्यवस्था न केल्याने रखडपट्टी झालेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अपघात झालेला असताना गाड्या का सोडल्या, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
रखडलेल्या प्रवाशांच्या मदतीला स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्था धावून आल्या. रेल्वे स्थानकात स्वच्छता मोहिमेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी या प्रवाशांना पाणी आणि बिस्कीट पुढे पुरवले, तर दुपारी काही संस्थांनी दुपारी जेवणाची व्यवस्था केली.
एसटीला तोबा गर्दी
रखडलेल्या प्रवाशांनी आपला मोर्चा एसटीकडे वळवला. माणगाव आणि महाड बस स्थानकांत प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. एसटी बस पकडण्यासाठी अक्षरशः झुंबड उडत होती. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने जादा गाड्या सोडल्या.
माणगाव स्थानकातून दुपारपर्यंत मुंबई, पनवेल, बोरिवली मार्गावर १९ जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. ठप्प झालेली कोकण रेल्वे संध्याकाळच्या सुमारास रुळावर येण्यास सुरुवात झाली.
वीर स्थानकात थांबलेली कोकणकन्या एक्स्प्रेस संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर काही गाड्या मार्गस्थ झाल्याचे सांगण्यात आले.