मार्च एण्डची वाहतूक पोलिसांकडून वसुली जोरात ! वाहतूक कोंडीकडे मात्र दुर्लक्ष

१० मार्च २०२५ पुणे : गेल्या काही दिवसांपासून नगर रस्त्यावरील चौकाचौकांत वाहतूक पोलिसांच्या टोळ्या मार्च एन्डमुळे सक्रिय झाल्या आहेत. चौकाचौकात दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून लुटण्याचे काम सुरू आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी वसुलीसाठी सक्रिय झालेले पुणे शहरातील वाहतूक पोलीस एवढी तत्परता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कधी दाखवणार, असा सवाल आता वाहन चालक करू लागले आहेत.

पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यातच विमाननगर, रामवाडी चौक (नोव्हाटेल) तसेच कल्याणीनगर येथील मुख्य चौक बंद करून मधूनच दुभाजक तोडून वाहतूक गोलाकार पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. गोलाकार वाहतूक करण्याचा निर्णय घेताना वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नाही.

तसेच या बदलाबाबत कोणत्याही प्रकारे सूचना, जाहिरात करण्यात आलेली नाही. अचानकपणे चौकात बॅरिकेटस लावून रस्ता बंद केल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण होत आहे. परिणामी, गुंजन चौक ते खराडी जकात नाक्यांपर्यंत वाहतूककोंडी होत आहे.पुणे शहर वाहतूक विभागातील पोलीस नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीकडे कधी लक्ष देणार आहे ?

चौकातील वाहतूक नियोजनात नसणारे वाहतूक पोलीस पावत्यांसाठी चौकाचौकात लुटारू टोळक्या सारखे थांबून वाहने अडवत आहेत. मात्र, दहा-पंधरा मिनिटांचा रस्ता पार करायला वाहनचालक, नागरिकांना दररोज अर्धा ते एक तास वाहतूक कोंडीत आजकून पडावे लागत आहे. त्याबद्दल वाहतूक पोलिसांना कोणतंही सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. कारण, खराडी दर्गा चौक, चंदननगर गार्डरूम चौक, अहिल्यादेवी होळकर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होऊनही ती सोडवण्यासाठी पोलीस येत नाहीत. तर या सर्व चौकात प्रचंड कोंडीत ते वाहने हेरून वसुली करत असल्याने वाहन चालकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

उर्वरित बीआरटी कधी काढणार ?

नागारिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नगर रस्त्यावरील विमाननगर-अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंतची बीआरटी मार्ग काढण्यात आला आहे. मात्र, अहिल्यादेवी होळकर चौक ते खराडी जकात नाक्यापर्यंतची बीआरटी तशीच ठेवली आहे. रात्री अपरात्री वाहनचालकांना या बीआरटी मार्गाचा अंदाज येत नसल्याने बीआरटीच्या सीमा भींतीवर येऊन धडकत, आधळत आहेत.

त्यात वाहनांचा पार चक्काचूर होत आहे. अनेकदा या अपघातांमध्ये वाहनचालक व नागरिकांना गंभीर दुखापत होत असून, अनेकांचा जीव देखील जात आहे. मात्र, पुणे महापालिका आणि पुणे शहर वाहतूक पोलीस दखलच घेत नाही. किती लोक मेल्यानंतर दोन्ही यंत्रणा जाग्या होणार आहेत, असा सवाल शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीधर गलांडे यांनी उपस्थित केला आहे.

रामवाडी मेट्रो स्टेशन आणि आगाखान पॅलेस समोरचा रस्ता खूपच आरुंद आहे. मात्र, याठिकाणी स्थानिकांना विचारात न घेता रात्रीत दुभाजक तोडून मधूनच बॅरिकेटस लावून वाहतूक वळवण्यात आली आहे. या बदलाबाबत कोणालाच काहीही कल्पना नसल्याने वाहचालकांचा प्रचंड गोंधळ उडत आहे. याठिकाणी वाहने वळण्यास पुरेशी जागा नाही. त्यामुळे कोणाला विचारून हा निर्णय घेण्यात आला आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. पुणे महापालिका प्रशासन आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याचे दिसत आहे. मात्र, यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना रोजच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. – प्रमोद देवकर- पाटील, अध्यक्ष, कर्तव्य जनमंच