प्रवास महागला ; आजपासून एसटी भाडेवाढ लागू !

२५ जानेवारी २०२५ मुंबई : एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा राज्य सरकारला सादर केलेला प्रस्ताव शुक्रवार, २४ जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.त्यामुळे आता १४.९७ टक्के एसटीची भाडेवाढ करण्यात आली असून ही भाडेवाढ शनिवार पासून राज्यभरात लागू होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

राज्य सरकारने एसटी प्रवासात ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती बंद करण्यात येणार नाहीत.त्या सवलती सुरूच राहतील.महिलांना एसटी तिकिटात ५० टक्क्यांची सूट देखील सुरू राहणार आहे,अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ राज्य सरकारने रद्द केली होती; परंतु वाढता तोटा पाहता महामंडळाने राज्य सरकारला १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. याआधी २०२१ मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती, तर गेल्या दोन वर्षांत चार वेळेस भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. याआधी २०२१ मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती, तर गेल्या दोन वर्षात चार वेळेस भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

यावर शुक्रवार, २४ जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.दरम्यान, एसटी महामंडळात सध्या १४ हजार बसेस कार्यरत असून दररोज ५५ लाख प्रवासी एसटीचा प्रवास करतात.याद्वारे महामंडळाला प्रतिदिन जवळपास २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.मात्र मासिक उत्पन्न आणि खर्च यांचे गणित जुळत नसल्याने दिवसाला सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागतो.

यासाठीच एसटी महामंडळाकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रवाशांना सुविधा देत असताना एसटी महामंडळाला खर्चही येतो.यामध्ये डिझेलचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत.यातच एसटी महामंडळाची परिस्थिती आपण पाहिली तर दरदिवशी सुमारे ३ कोटींचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

असे आहेत नवीन दर

एसटीमधून प्रवास करताना प्रति टप्पा ६ किमीसाठी भाडे आकारले जाते.साध्या बसचे सध्याचे भाडे ८.७० रुपये आहे, ते आता ११ रुपये असेल.जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचेही भाडे सारखेच असेल.निमआरामसाठी ११.८५ रुपयांऐवजी १५ रुपये मोजावे लागतील.शिवशाही (एसी) बसचे भाडे १२.३५ वरून १६ रुपये झाले आहे.तर शिवशाही स्लिपरसाठी (एसी) १७ रुपये मोजावे लागणार आहे.तसेच शिवनेरीचे (एसी) भाडे १८.५० ऐवजी २३ रुपये झाले आहे.तर शिवनेरी स्लिपरचे भाडे २८ रुपये आहे.

१ फेब्रुवारीपासून रिक्षा, टॅक्सीही महाग

मुंबईत आता सार्वजनिक वाहतूक अर्थात टॅक्सी आणि रिक्षाचे दर देखील महागणार आहेत. ही भाडेवाढ ३ रुपये प्रति किलोमीटर होणार आहे.यासाठी मुंबई आणि मेट्रोपोलिटन भागात आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी ३१ रुपये द्यावे लागणार आहेत.तर रिक्षाच्या प्रवासासाठी कमीत कमी २६ रुपये द्यावे लागतील. हे वाढीव दर १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe