१ फेब्रुवारी २०२५ पुणे : गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे (जीबीएस) धायरी परिसरातील एक ६० वर्षीय पुरुष व पिंपरी-चिंचवडमधील ३६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू जीबीएसमुळे झाला आहे.धायरी परिसरातील व्यक्तीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
त्याला अशक्तपणा जाणवत होता. तसेच त्याला हृदयविकाराचा झटका आला. तर पिंपरी-चिंचवडमधील पुरुष कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे दाखल होता. न्यूमोनियामुळे श्वसन संस्थेस झालेला आघात यामुळे श्वास घेण्यात अडचण येत होती. या रुग्णास जीबीएसचा त्रास होत होता.
दरम्यान, शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूचे आतापर्यंत १४० संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ९८ रुग्णांची जीबीएस म्हणून निदान निश्चिती झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ११ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत १०४, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १५ तसेच इतर जिल्ह्यांतील १० रुग्ण अशा एकूण १४० रुग्णांवर सध्या पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
यापैकी १८ रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत.दरम्यान, शुक्रवारी एकाही रुग्णाची नोंद झाली नाही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनी लहान मुलांसह वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.