मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी कसली कंबर ; ‘डोअर टू डोअर’ गाठीभेटी घेण्याचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Mahesh Waghmare
Published:

४ जानेवारी २०२५ मुंबई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी त्यांनी ‘मातोश्री’वर बैठक घेतली. ‘सर्व प्रभाग पिंजून काढा, डोअर टू डोअर गाठीभेटी घेऊन मतदारांच्या अपेक्षा जाणून घ्या,’ असे आदेश ठाकरे यांनी त्या बैठकीत दिले.

आघाडीला विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार झटका दिला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे; तर गेली २५ वर्षे एकहाती सत्ता राखलेल्या शिवसेनेने (ठाकरे) महापालिकेवरील वर्चस्वासाठी ताकद पणाला लावली आहे. शिवसेनेने (ठाकरे) स्वबळावर लढण्याच्या हालचालीही सुरू केल्याच्या चर्चा असल्या, तरी महाविकास आघाडीतील नेत्यांनी महापालिका निवडणुका एकत्र लढण्यासाठी ठाकरेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

या सर्व घडामोडींत ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शुक्रवारी माजी नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली गेली. महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, असे आदेश त्यांनी प्रत्येक बैठकीत दिले. खासदार, आमदारांनी माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख, पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधावा, असे आवाहन करून त्यांनी प्रभागवार आढावा घेतल्याचे समजते.

अॅक्शन प्लॅन तयार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने (ठाकरे) अॅक्शन प्लॅन तयार केला असून मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील २२७ प्रभागांत ‘भगवा फडकवण्या ‘साठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत क्रमांक १ ते ७ झोनचे विभागप्रमुख व व उपविभागप्रमुख उपस्थित होते. त्यात २१ विधानसभा मतदारसंघांतील रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याचे शिवसेनेतील नेत्याने सांगितले.

१५ दिवसांतून बैठक

शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,महिला पदाधिकाऱ्यांच्या विभाग पातळीवर बैठका घेतल्या जाणार आहेत. विभागप्रमुखाच्या अध्यक्षतेखाली १५ दिवसांतून किमान एकदा या बैठका आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. शाखा पातळीवर बैठका आयोजित करून निवडणुकीची रणनीती ठरणार असल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe