Maharashtra News : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची भूमिका घेतली आहे.
कितीही आव्हान असली तरी मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन कैलासराव तांबे यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला असून, उत्पादित झालेल्या साखरेच्या पहिल्या पाच पोत्यांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदूशेठ राठी, कारखान्याचे व्हा. चेअरमन सतीश ससाणे, संजय आहेर, दादासाहेब घोगरे, सुभाष अंत्रे, साहेबराव म्हस्के, कामगार संचालक ज्ञानदेव आहेर, अमोल थेटे, कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्यासह सर्व संचालकांच्या उपस्थितीत पोत्यांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना तांबे म्हणाले की, यंदाचा गळीत हंगाम वेळेत सुरू झाल्याने गाळपाचे नियोजन यशस्वी होईल. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने तसेच व्यवस्थापनाने गाळपाचे नियोजन केले आहे.
या नियोजनानुसार गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करणार असल्याचा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला. यावर्षी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार ७०० रुपये भाव देवून मोठा दिलासा दिला. बाहेरून आणलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुध्दा तेवढाच भाव देण्याचा ना. विखे पाटील यांचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली.
पावसाअभावी शेतकऱ्यांपुढे संकट असताना या परिस्थितीत कारखान्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील वर्षीचा भावही जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याचे मार्गदर्शक ना. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम होत आहे. कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढावे म्हणून प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आल्याचे सांगून,
कितीही आव्हान असली तरी गळीत हंगाम यशस्वी करण्याचे उद्दिष्ट कारखाना सर्वाच्या सहकार्याने पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.